बारामती : पुढारी वृत्तसेवा
केवळ १८ महिन्याच्या बालकाने अनवधानाने चाव्यांचा जुडगा गिळला. तो श्वासनलिकेच्या वरील बाजूत अडकल्याने हे बालक अत्यवस्थ झाले होते. बारामतीतील श्रीपाल हाॅस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आले. डाॅ. राजेंद्र मुथा व डाॅ. सौरभ मुथा यांनी अवघ्या अर्ध्या तासात 'ब्रॉन्कोस्कोपी' करत या बालकाला जीवदान दिले.
भिगवण येथील आरुष अतुल गुणवरे (वय १८ महिने) असे या बालकाचे नाव आहे. चाव्यांचा जुडगा गिळल्यानंतर आरुषला प्रथम भिगवणमध्ये दवाखान्यात नेण्यात आले. तेथील डॉ. त्रिंबक मोरे, डॉ. गाढवे यांनी तातडीने डॉ. मुथा यांच्याशी संपर्क साधत त्याला दाखल करण्यास सांगितले. आरुषला अत्यवस्थ अवस्थेत हाॅस्पिटलमध्ये आणण्यात आले. त्यावेळी त्याच्या तोंडातून रक्त आणि लाळ बाहेर येत होती. त्याचा जीव गुदमरण्यास सुरवात झाली होती.
डॉ. राजेंद्र मुथा, डॉ. सौरभ मुथा यांनी परीस्थितीचे गांभीर्य ओळखत तातडीने उपचार सुरु केले. त्याने गिळलेला चाव्यांचा जुडगा नाकाच्या मागे श्वासनलीकेच्या वरील बाजुस अडकल्याचे डॉ. मुथा यांनी केलेल्या एक्स-रे मध्ये दिसुन आले. त्यानंतर डॉ. मुथा यांनी तातडीने कान-नाक-घशाचे तज्ज्ञ डॉ. वैभव मदने, भुलतज्ज्ञ डॉ. अमर पवार यांच्याशी संपर्क साधत त्यांची मदत घेतली व दुर्बिणीद्वारे 'ब्रॉन्कोस्कोपी' करीत चाव्यांचा जुडगा काढत आरुषला जीवदान दिले.
लहान मुले घरामध्ये खेळत असताना दिसेल ती वस्तू गिळण्याचा प्रयत्न करत असतात. घरातील वस्तूही गुंतून लहान मुलांचा जीव धोक्यात येतो. त्यामुळे गृहिणींनी घरामध्ये लहान मुलांपासुन लोखंडी, टोकदार वस्तू, रासायनिक औषधे दूर ठेवावीत. सोशल मिडियात पालक गुंतून पडल्याने झालेले दुर्लक्ष बालकांसाठी धोकादायक ठरते आहे.
– डाॅ. राजेंद्र मुथा, प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ, बारामती