

वेल्हे(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पानशेत धरणाजवळील दुर्गम आंबी (ता. हवेली) येथे दत्तात्रय निवंगुणे यांच्या 10 शेळ्या,6 बोकड व 2 वासरे अशा 18 जनावरांना बिबट्याने एकाच रात्रीत ठार केले. गोठ्यातील एकाही जनावराचे प्राण वाचले नाहीत. एकाच वेळी हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात मोठ्या संख्येने जनावरांचा मृत्यू झाल्याने वनखाते अचंबित झाले आहे. सिंहगड (खानापूर) वनविभागाचे पथकाने पशुवैद्यकीय पथकासह घटनास्थळी धाव घेऊन मृत जनावरांचा पंचनामा केला. हा प्रकार गुरुवारी (दि. 6) सकाळी साडेसात वाजता उघडकीस आला. दोन दिवसांपूर्वी मंगळवारी (दि. 4) गावातील शेतकरी दत्तात्रय निवंगुणे यांच्या दोन बकर्यांना हिंस्र वन्यप्राण्याने रानात मारले होते. मात्र, त्यांनी त्या बाबत वनविभागाला माहिती दिली नाही.
आंबी येथील काँग्रेसचे सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष लहुआण्णा निवंगुणे यांच्या शेतातील शेडमध्ये दत्तात्रय निवंंगुणे यांचा शेळ्यांचा गोठा आहे. बुधवारी (दि. 5) सायंकाळी नेहमीप्रमाणे शेळ्या, बोकड, गाईच्या वासरांना गोठ्यात बांधून आंबी गावातील घरी आले. सकाळी गोठ्यात गेले असता गोठ्यातील सर्व शेळ्या, जनावरांना हिंस्र प्राण्याने ठार मारल्याचे दिसले.
गोठ्यात विखुरलेल्या अवस्थेत मृत जनावरे पडल्याचे पाहून शेतकरी दत्तात्रय निवंगुणे व त्यांच्या पत्नी-मुलांनी जोरदार हंबरडा फोडला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक कार्यकर्ते राजू पासलकर, संजय निवंगुणे आदींनी गोठ्यात धाव घेतली. वनरक्षक बाळासाहेब जिवडे, ऋषिकेश लाड, रमेश खामकर यांच्यासह पशुवैद्यकीय पथकानेही घटनास्थळी धाव घेतली.
बिबट्यासदृश हिंस्र वन्यप्राण्याने गोठ्यात शिरून एका पाठोपाठ एक जनावरांना ठार मारले आहे. शेळ्या, बोकड व वासरांच्या मानेचा तसेच मांसाळ भागाचा चावा घेतला. मध्यरात्री ते आज पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला आहे, असे वनरक्षक बाळासाहेब जिवडे म्हणाले. हिंस्र प्राण्यांच्या पायाचे ठसे घेतले जात आहेत. वनविभागाच्या इतिहासात प्रथमच एकाच शेतकर्याच्या इतक्या जनावरांना हिंस्र प्राण्याने ठार मारण्याचा प्रकार घडला आहे. याबाबत वरिष्ठांसह सखोल चौकशी सुरू आहे.
हेही वाचा