का वाढतेय उन्हाची काहिली? | पुढारी

का वाढतेय उन्हाची काहिली?

पुणे : शिवाजी शिंदे झाडांचे कमी झालेले प्रमाण, औद्योगिक क्षेत्रातील वाढलेली कारखानदारी, त्यामुळे हवेत वाढलेला कार्बनडाय ऑक्साईड, वाहनांमधील धुरामुळे वाढलेले प्रदूषण, याचबरोबर देशात मान्सूनपूर्व पावसाने दिलेली ओढ, जमिनीची वाढलेली धूप, पश्चिमी चक्रवात तयार न होणे, तसेच उत्तरेकडून वाहणारी गरम हवा यामुळे मार्च आणि एप्रिल महिन्यात देशभर उन्हाची काहिली वाढली.

यावर्षी देशात मार्च आणि एप्रिल हे दोन्ही महिने गेल्या 122 वर्षांत पहिल्यांदाच सर्वाधिक उष्णतेचे ठरले आहेत. या दोन्ही महिन्यांत मध्य भारतातील राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, महाराष्ट्र, झारखंड, उत्तराखंड, तर उत्तर भारतातील हिमालयीन भागात उष्णतेचा कहर दिसून आला.

याबरोबरच दक्षिण भारतातील तेलंगण, आंध— प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळ या राज्यांनाही उष्णतेचा मोठा फटका बसला.
उष्णतेच्या कडक लाटेमुळे संपूर्ण देशातील कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा 4 ते 5 अंश सेल्सिअसने वाढलेला होता. त्यामुळेच उष्णतेच्या लाटेने कहर केल्याचे दिसून आले. वातावरण बदलात वृक्षतोड या बाबीचा मोठा वाटा आहे. वृक्षतोडीमुळे कमाल तापमानात वाढ झाली. गेल्या काही वर्षांत आशिया खंडात 55 दशलक्ष हेक्टर क्षेत्रावरील झाडे तोडली, तर आफ्रिका खंडातील 65 दक्षलक्ष हेक्टर क्षेत्रातील झाडे नागरिकांनी नष्ट केली.

लॅटिन अमेरिकेत 85 दशलक्ष हेक्टर क्षेत्रावरील झाडे पूर्णपणे तोडली गेली. जगातील एकूण 400 दशलक्ष हेक्टर जंगल गेल्या काही वर्षांत पूर्णपणे नेस्तनाबूत झाले. अजूनही दरवर्षी जगातील दहा लाख हेक्टर क्षेत्रावरील झाडे तोडली जात आहेत. या कारणामुळे देशासह जगात तापमानवाढ होत आहे. महाराष्ट्रातील 33 टक्के जमिनीवर सध्या केवळ 17 टक्के जंगल उरले आहे. याबरोबरच वाढलेली कारखानदारी, वाहनांमधून बाहेर पडत असलेला धूर, त्यामुळे हवेत वाढलेले प्रदूषण या कारणांमुळेसुद्धा देशात यावर्षी सर्वाधिक तापमानात वाढ झाली आहे.

सन 2030 पर्यंत हवामानात आणखी विविध बदल घडून येण्याची शक्यता वाढली आहे. त्यामध्ये अचानक पावसाचे प्रमाण कमी होणे, दुष्काळ पडणे, चक्रीवादळाचे प्रमाण वाढणे, थंडी सरासरीपेक्षा जास्त पडण्याची शक्यता आहे. यामुळे जंगलातील प्राण्यांबरोबरच मानवी वस्त्यांनाही धोका पोहोचण्याची शक्यता आहे.

एप्रिल महिन्यापेक्षा मार्च महिना हा कडक उष्णतेच्या लाटेमध्ये गेला; तर एप्रिलमध्ये तापमान सरासरीच्या आसपास होते. तापमानवाढीची कारणे वेगवेगळी आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने देशात उत्तरेकडून मोठ्या प्रमाणात गरम हवा आली, तसेच मान्सूनपूर्व पाऊस पडलाच नाही. त्यामुळे जमिनीमधील तापमानाचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त वाढले. हवेच्या वरच्या भागात तापमानाचे प्रमाण वाढले. सर्वात प्रमुख कारण म्हणजे मार्च आणि एप्रिल महिन्यात पश्चिमी चक्रावात चांगलेच वाढलेले असतात. त्यामुळे तापमान सरासरीच्या आसपास राहते. मात्र यावर्षी मार्च आणि एप्रिल महिन्यात पश्चिमी चक्रावात तयार झाले नाहीत. त्यामुळे या दोन महिन्यांत विक्रमी तापमानाची नोंद झाली.

– अनुपम कश्यपी, भारतीय हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख

हवेत गेल्या काही वर्षांपासून काबर्न डाय-ऑक्साईडचे प्रमाण वाढले आहे. काबर्न डाय-ऑक्साईड वातावरणात उष्णता धरून ठेवतो. त्यामुळे तापमान वाढते. ग्लोबल वॉर्मिंगमुळे हवामानतही बदल झाले.
– डॉ. रामचंद्र साबळे, हवामान अभ्यासक

हेही वाचलतं का?

Back to top button