

पुणे: राज्यातील औषधनिर्माणशास्त्र संस्थांची तपासणी केल्यानंतर डिप्लोमाच्या 128 तर डिग्रीच्या 48 महाविद्यालयांनी फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या निकषांची पूर्तता केली नसल्याचे उघडकीस आले आहे.
त्यामुळे संबंधित संस्थांना त्रुटींची पूर्तता केल्याशिवाय यंदाची प्रवेशप्रक्रिया राबविता येणार नसल्याचे ’तंत्रशिक्षण संचालनालया’चे संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी स्पष्ट केले आहे. तसेच संबंधित संस्थांची यादी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. (Latest Pune News)
डॉ. मोहितकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील शैक्षणिक वर्ष 2022-23, 2023-24 व 2024-25 मध्ये मान्यता देण्यात आलेल्या औषधनिर्माणशास्त्र संस्थांची, फार्मसी कौन्सील ऑफ इंडीया या शिखर परिषदेच्या मानकांनुसार स्टॅडंर्ड इन्सपेक्शन फॉरमॅटमधील अनिवार्य बाबींच्या पूर्ततेच्या अनुषंगाने तपासणी करण्याचे निर्देश शासनाने दिले होते.
संबंधित कार्यवाहीच्या अनुषंगाने शासनाने आयोजित केलेल्या आढावा बैठकीचे इतिवृत्त राज्य तंत्रशिक्षण मंडळाला प्राप्त झाले आहे. संबंधित इतिवृत्तानुसार, प्रथम वर्षासाठी प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार्या सर्व पदवी, पदविका संस्थांची यादी तंत्रशिक्षण संचालनालय, संबंधित विद्यापीठ, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ यांनी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच संबंधित अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या पोर्टलवर ठळकपणे प्रसिध्द करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये औषधनिर्माणशास्त्र पदविका आणि पदवी अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया राबविणार्या संस्थांना महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत आवश्यक निकष पूर्तता न केलेल्या संस्थांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून तंत्रशिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर संबंधित संस्थांची यादी प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संबंधित संस्थांमध्ये प्रवेश घेताना काळजी घेणे गरजेचे असल्याचे स्पष्ट झाले आहे.