11th Admission: अकरावी प्रवेशाच्या शेवटच्या फेरीची गुणवत्ता यादी उद्या
पुणे: माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडून राज्यात अकरावी प्रवेशाची शेवटची फेरी राबवण्यात येत आहे. या फेरीची गुणवत्ता यादी उद्या (दि. 29) रोजी जाहीर करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना 29 आणि 30 ऑगस्टला प्रवेशाची संधी देण्यात येणार आहे. त्यानंतर अकरावी प्रवेश प्रक्रिया संपुष्टात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, राज्यात प्रवेशासाठी तब्बल 8 लाख 80 हजार 768 जागा रिक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अकरावी प्रवेशासाठी राज्यात 9 हजार 535 महाविद्यालयांमध्ये 18 लाख 14 हजार 802 जागा कॅप प्रवेशाच्या तसेच 3 लाख 44 हजार 10 जागा कोटा प्रवेशाच्या अशा एकूण 21 लाख 58 हजार 812 जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी 14 लाख 71 हजार 892 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 11 लाख 13 हजार 475 विद्यार्थ्यांनी कॅपमधून तर 1 लाख 64 हजार 569 विद्यार्थ्यांनी कोटाअंतर्गत अशा 12 लाख 78 हजार 44 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. (Latest Pune News)
आता प्रवेशासाठी अद्यापही 7 लाख 1 हजार 327 जागा कॅप प्रवेशाच्या तसेच 1 लाख 79 हजार 441 जागा कोटा प्रवेशाच्या अशा एकूण 8 लाख 80 हजार 768 जागा प्रवेशासाठी उपलब्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
अकरावी प्रवेशाच्या शेवटच्या फेरीत 25 ऑगस्टला प्रवेशासाठी रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या. त्यानंतर 26 आणि 27 ऑगस्टला आत्तापर्यंतच्या फेर्यांमध्ये प्रवेश न मिळालेले विद्यार्थी, पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थी, एटीकेटी विद्यार्थ्यांना अकरावीचा भाग एक आणि भाग दोन भरण्याची संधी देण्यात आली.
आता 29 ऑगस्टला संबंधित फेरीसाठी प्रवेश जाहीर करण्यात येणार असून, प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना 29 आणि 30 ऑगस्टला प्रवेश निश्चित करता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ही शेवटची संधी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

