पुणे : चासकमान धरणाच्या उजव्या कालव्याच्या मध्यभागी भगदाड | पुढारी

पुणे : चासकमान धरणाच्या उजव्या कालव्याच्या मध्यभागी भगदाड

कडूस (पुणे), पुढारी वृत्तसेवा : कडूस ढमालेशिवार (ता. खेड) परिसरातून जाणाऱ्या चासकमान धरणाच्या उजव्या कालव्याच्या मध्यभागी भगदाड पडल्याने हजारो लीटर पाणी वाया गेले. चासकमान धरण जल प्रकल्पाला डावा आणी उजवा असे दोन कालवे आहे. उजवा कालवा कडूस ढमालेशिवार परिसरातून जात असून कालव्याच्या मध्यभागी दुसऱ्यांदा भगदाड पडले आहे. त्‍यामूळे हजारो लीटर पाणी वाया जात आहे. कालव्यातील माती पाण्याच्या प्रवाहाने वाहून जात कालवा फुटण्याची शक्यता आहे. तसेच हजारो शेतकऱ्यांच्या शेतपीकाची व कालव्याची मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.

गेल्‍या काही दिवसांपुर्वी याच ठिकाणी भगदाड पडल्यामुळे हजारो लीटर पाणी वाया जात होते. ग्रामस्थांनी तक्रार केल्यावर त्या ठिकाणी जाड प्लॅस्टिकचा कागद टाकून त्यावर मातीचा भराव टाकण्यात आला होता. परंतु पाण्याचा दाब प्रचंड असल्याने तो पुन्हा मध्यभागी फाटून या ठिकाणाहून पाण्याची पुन्हा हळूहळू गळती होऊन भगदाड पडले. कालव्यातून पाणी वाया जात असल्याने धरण प्रशासनाने सद्या तरी कालव्याचे आवर्तन बंद केले असले तरी कालव्याची दुरुस्ती मात्र अद्याप केली नाही.

चासकमान धरण पाटबंधारे विभागाने अक्षम्य दुर्लक्ष केल्याने अशा घटना सतत घडत असून या विषयी शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कालव्याचे आवर्तन बंद केल्याने या कालव्यावर अवलंबून असलेल्या कडूस, ढमालेशिवार, आगरमाथा, दोंदे, वडगाव, चांडोली, शिरोली, खरपुडी परिसरातील शेतकरी बांधवाची पिके वाळली असून कालव्यावरील शेती पिके धोक्यात आली आहेत. या कालव्याचे नव्याने अस्तरीकरण करावे अशी मागणीचा जोर नागरिकांनी धरला आहे. तसेच या कालव्यामध्ये झाडे झुडपे वाढली आहेत. कोणत्याही प्रकारची देखभाल केली जात नाही. या कालव्यांचे अस्तरीकरण करण्यात यावे अन्यथा कालवा पाणी बंद आंदोलन करण्याचा इशारा परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे.

हेही वाचा 

Back to top button