

पुणे: पुणे आणि मुंबईला जोडणारी डेक्कन क्वीन या चाकरमान्यांच्या लाडक्या रेल्वेचा पुणे रेल्वे स्थानकावर 96 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रेल्वे प्रवासी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
या सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी केक कापून वाढदिवस साजरा केला. त्यानंतर गाडी मुंबईच्या दिशेने सकाळी सव्वा सातच्या सुमारास रवाना झाली. यावेळी या रेल्वेच्या चालकांचा सत्कार करण्यात आला, त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची दखल घेण्यात आली. (Latest Pune News)
यावेळी मध्य रेल्वे पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी हेमंत कुमार बेहरा, पुणे रेल्वे स्थानक संचालक संजय कुमार, पुणे रेल्वे स्टेशन व्यवस्थापक रवींद्र धुमाळ आणि अन्य प्रमुख रेल्वे अधिकारी उपस्थित होते.
रेल्वे प्रवासी ग्रुपचे सदस्य अॅड. आशुतोष रानडे, सीनियर एजीपी अॅड. संजय रायरीकर, गणपत मेहता आणि सुधीर शहा यांनीही कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेऊन तो यशस्वी करण्यात मोलाचे योगदान दिले.