दिलीप वळसे-पाटील : ‘भाजपच्याच नेत्यांना दिलासा कसा काय मिळतो याचे आश्चर्य’ | पुढारी

दिलीप वळसे-पाटील : 'भाजपच्याच नेत्यांना दिलासा कसा काय मिळतो याचे आश्चर्य'

मुंबई ; पुढारी ऑनलाईन : भाजप नेते किरीट सोमय्या यांना काल हायकोर्टाने अटकपूर्व जामीन देत दिलासा दिला. यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांनी टीका करायला सुरूवात केली आहे. दरम्यान गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त करत भाजपच्याच नेत्यांना दिलासा कसा काय मिळते याबाबत आम्हाला आश्चर्य वाटत असल्याचे म्हणाले.

मागच्या कित्येक वर्षांपासून शरद पवार यांचे नाव दाऊदशी जोडले जाते पण यातून विरोधकांना काहीही मिळाले नाही. दरम्यान आयएनएस विक्रांत प्रकरणी किरीट सोमय्यांचा जामीन मंजूर होतो ही आश्चर्याची बाब आहे. त्यांना हायकोर्टाकडून दिलासा मिळाल्याने आम्हाला आश्चर्य वाटल्याचे ते म्हणाले.

याचबरोबर परवानगी घेऊन भोंगे लावलेल्या मशीदींवरील भोंगे काढण्याचा प्रश्नच राहत नाही. तसेच भोंगे काढण्याच कोर्टाने कोणताही निर्णय दिला नसल्याचे दिलीप वळसे-पाटील म्हणाले.

उच्च न्यायालयात अटक टाळण्यासाठी किरीट सोमय्या यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. सोमय्यांचे चिरंजीव नील यांचाही अटकपूर्व जामीन अर्जही मंगळवारी सत्र न्यायालयाने फेटाळला पण उच्च न्यायालयात त्यांचा जामीन मंजूर झाला.

संजय राऊत यांची जोरदार टीका

आयएनएस विक्रांत निधी घोटाळ्यात अटकेची टांगती तलवार असल्याने भूमिगत झालेले भाजप नेते किरीट सोमय्या जामीन मिळताच पुन्हा एकदा प्रकट झाले आहेत. त्यांना जामीन मिळताच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चार शब्दांमध्ये खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी एक दिलासा घोटाळा असे ट्विट करत त्यांनी सोमय्यांना मिळालेल्या जामीनावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे. किरीट सोमय्या यांनी जामीन मिळताच मुंबई उच्च न्यायालयाचे आभार मानले आणि लागलीच ठाकरे सरकारविरुद्ध लढा सुरुच ठेवणार असल्याचे घोषित करून टाकले.

किरीट आणि नील सोमय्या यांच्या दारावर आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीचे समन्स मंगळवारी चिकटवले होते. दोघा पिता-पुत्रांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी सकाळी 11 वाजता हजर होण्यास बजावले होते, पण ते गैरहजर राहिले.

Back to top button