

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : कोरोना निर्बंध आणि टाळेबंदीमुळे दर वर्षी होणारी पिंपरी चिंचवड शहरातील प्रदर्शने यावर्षीपासून पुन्हा सुरू होत आहेत.
एप्रिल महिन्यापासून शहरात विविध प्रदर्शनांना सुरुवात होते. इंडस्ट्रियल वस्तूंपासून ते टेक्नॉलॉजीपर्यंत क्षेत्रातील विविध प्रदर्शनाचे नोव्हेंबरपर्यंतचे बुकिंग झाले आहे.
2020 पासून कोरोनामुळे निर्बंध आणि टाळेबंदी यामुळे शहरात प्रदर्शने भरवली जात नव्हती. त्यासोबतच सार्वजनिक ठिकाणी, समारंभात व्यक्तींच्या उपस्थितीवर मर्यादा होत्या. त्यामुळे प्रदर्शने भरवण्याची तयारी नव्हती.
सर्वच निबर्ंध हटवले गेल्याने शहरात नोव्हेंबर महिन्यापर्यंत प्रदर्शन घेण्यासाठी बुकिंग झाले आहेत. इंडस्ट्रियल, टेक्नॉलॉजी तसेच शेती अशा विविध वस्तू व उत्पादनांचे प्रदर्शन भरवले जाणार आहे.
प्रदर्शनात सहभाग घेतल्याने उत्पादन, वस्तू याची माहिती करून देता येते. यंत्र प्रत्यक्ष बघता येतात आणि व्यावसायिक देवाण-घेवाण करता येते. यामुळे प्रदर्शनांना व्यावसायिक दृष्टीने महत्व आहे.
शहरात ऑटो क्लस्टर, एच. ए. मैदान, इंटर नॅशनल एक्सिबिशन सेंटर आदी विविध ठिकाणी प्रदर्शन भारवली जातात. कोरोनाच्या टाळेबंदीत अनेकांनी विविध व्यवसाय सुरू केले तसेच नवीन उत्पादने देखील सुरू केली आहेत.
यावर्षी इंडस्ट्रियल, टेक्निकल, मेडिकल, शेती, पर्यटन, फोटो फेअर, फॅशन आदी विविध प्रदर्शन होणार असून नोव्हेंबरपर्यंतचे बुकिंग झाले आहे.
प्रदर्शनांच्या तारखा देखील ठरविण्यात आल्या आहेत. त्यामुळे यावर्षी प्रदर्शनात मोठ्या प्रमाणात व्यावसायिक आदान-प्रदान होईल, अशी अपेक्षा व्यावसायिक व्यक्त करत आहेत.