पुणे : स्‍वत:च्या अपहरणाचा महिलेने रचला बनाव; अवघ्या ४ तासात पोलिसांनी उघड केले षडयंत्र | पुढारी

पुणे : स्‍वत:च्या अपहरणाचा महिलेने रचला बनाव; अवघ्या ४ तासात पोलिसांनी उघड केले षडयंत्र

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा  येथील वैद्य वस्ती येथे कारमधून आलेल्या व्‍यक्‍तीने एका (२४ वर्षीय) महिलेला विचारणा करण्याच्या बहाण्याने गाडीत ओढून नेऊन तिचे अपहरण केले. ही घटना बुधवारी (दि. ६) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. नारायणगाव पोलिसांनी घटना घडल्यानंतर अवघ्या चार  तासात आरोपींना पकडले. यानंतर या महिलेने लग्नापूर्वी संशयितांशी असलेल्या ओळखीतून स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचला असल्याचे धक्कादायक माहिती सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

या प्रकरणी महेश लोखंडे व राहुल कनगरे (रा. राहूरी) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  या बाबतची फिर्याद अपहरण करणार्‍या महिलेचा पती मयुर गोविंद शिंदे (वय २५) यांनी दिली होती.

याप्रकरणी पाेलिसांनी .िदिलेल्‍या माहितीनुसार, बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास नारायणगाव येथील वैदवाडी या ठिकाणी अज्ञात व्‍यक्‍तींनी एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून येत काहीतरी विचारण्याचा बहाणा पत्नीचे अपहरण केले. ही तक्रार दाखल होताच सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी तपासाची सूत्रे फिरवली. त्यानुसार तपास पथकाने प्रथम वाहन क्र. ६८७३ चा शोध घेतला असता, या कारचा क्रमांक एमएच ०४ डीडब्लू ६८७३ असल्याचे समजले.

वाहनाच्या मुळ मालकाबाबत माहिती काढून सीसीटीव्हीच्या आधारे बघितले असता, ही गाडी बेल्हा रस्त्याने नगरकडे गेल्याचे दिसून आले. तपास पथक नगरच्या दिशेने रवाना झाले.  कार महेश लोखंडे व राहुल कनगरे हे घेवून गेले असून, सायंकाळी ५ वाजता वाहन देण्यासाठी येणार असल्याचे  कारमालकाने सांगितले. त्यानुसार पोलीस पथकाने सापळा रचून अवघ्या चार तासात संशयितांसह महिलेला ताब्यात घेतले.  तिचा जबाब घेतला असता तिने स्वतःच महेश लोखंडे यांच्याशी विवाहापूर्वी असलेल्या ओळखीतून या अपहरणाचा बनाव केला असल्याची कबुली दिली.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश गट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे, सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दुर्वे, पोलिस जवान सचिन कोबल, शैलेश वाघमारे, दिनेश साबळे, दीपक साबळे, होमगार्ड अक्षय ढोबळे यांनी केली.

हेही वाचा :

Back to top button