पुणे मनसेत ‘नाराजीच्या’ भोंग्याचा आवाज वाढला ! शहराध्यक्ष वसंत मोरे यांची पदावरून हकालपट्टी | पुढारी

पुणे मनसेत 'नाराजीच्या' भोंग्याचा आवाज वाढला ! शहराध्यक्ष वसंत मोरे यांची पदावरून हकालपट्टी

पुणे; पुढारी ऑनलाईन : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीच्या भोंग्याला हनुमान चालीसा लावून उत्तर देण्याचे सांगितल्यानंतर मनसेमध्येच आता त्याची प्रतिक्रिया उमटू लागली आहे. राज ठाकरेंच्या वक्तव्याने अडचणीत आल्याचे जाहीरपणे सांगणाऱ्या पुणे मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे मनसेमध्ये नाराजीचा भोंगा सुरु झाल्याचे बोलले जात आहे.

वसंत मोरे यांची पदावरून हकालपट्टी केल्यानंतर राज ठाकरे यांनी साईनाथ बाबर यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. राज ठाकरेंनी भोंग्यावर हनुमान चालीसा लावण्याचा उतारा दिल्यानंतर वसंत मोरे यांनी त्याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली होती. माझ्या प्रभागात शांतता हवी असल्याने हनुमान चालीसा लावणार नाही, सध्या रमजान सुरु असल्याने मला माझ्या प्रभागात शांतता हवी आहे. त्याचबरोबर मी अशी भूमिका घेतली असली, तरी मी राज ठाकरेंवर नाराज आहे असे काही नसल्याचेही त्यांनी म्हटले होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींसमोर भोंगे लावण्याबाबत दिलेल्या आदेशाने पुण्यातील मनसेच्या कार्यकर्त्यांत
चलबिचल झाली आहे. कप्रतिनिधी म्हणून माझ्या प्रभागात ही भूमिका घेणे अडचणीचे ठरणार असल्याचे मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनीही स्पष्ट केले. शहराबाबत पक्षाच्या कोअर समितीने निर्णय घ्यावा, अशी भूमिका त्यांनी मंगळवारी घेतली.

मनसेचा गुढीपाडवा मेळावा मुंबईत शिवाजी पार्क येथे झाला. त्या वेळी मशिदींवरील भोंगे उतरवावेच लागतील. राज्य सरकारने याबाबत निर्णय घ्यावा; अन्यथा त्याच्यासमोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावा, अशी भूमिका ठाकरे यांनी मेळाव्यात जाहीर केली. त्याचे पडसाद राज्यात उमटू लागले आहेत. मनसेच्या दोन मुस्लिम पदाधिकार्‍यांनी राजीनामे दिले.

त्यापाठोपाठ शहराध्यक्षांच्या भूमिकेने पक्षाच्या अन्य पदाधिकार्‍यांची अडचण झाली. मात्र, ठाकरे यांचीच भूमिका अंतिम राहील, असे मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी स्पष्ट केले. मनसेची मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे याच महानगरांत ताकद आहे. पुण्यामध्ये गेल्या महापालिका निवडणुकीत मनसेच्या नगरसेवकांची संख्या 29 वरून 2 झाली. मोरे व साईनाथ बाबर हे दोघेच निवडून आले. दोघांच्याही प्रभागांत मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय असल्यामुळे पक्षाच्या भूमिकेची अंमलबजावणी करणे त्यांना राजकीयदृष्ट्या अडचणीचे ठरणार आहे.

हे ही वाचलं का ?

Back to top button