Pune : भामा आसखेड धरणात 15.26 टक्के साठा; पश्चिम भागातील गावच्या पाणीपुरवठा योजना बंद
भामा आसखेड : भामा आसखेड धरणाच्या 33 दिवसांच्या आवर्तनात तब्बल 33 टक्के पाणीसाठा धरणातून सोडल्यानंतर बुधवारी (दि. 14) आवर्तन बंद केले. सध्या धरणात 15.26 टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
भामा आसखेड धरणाचे उन्हाळी आवर्तनात आजपर्यंतचे सर्वात मोठे 33 दिवसांचे आवर्तन ठरले आहे. महिना उलटला तरीही भामा आसखेड धरणातून आवर्तन सुरूच राहिल्याने तालुक्यातील शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त केली. धरणाचा जलसाठा प्रमाणापेक्षा खाली गेल्याने धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणार्या पश्चिम भागातील गावच्या पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. पाणीपुरवठा विहिरी कोरड्याठाक पडल्याने काही गावांना टँकरने पाणी पुरविले जात आहे. परिसरातील अनेक गावातील उन्हाळी भुईमूग, बाजरी व अन्य पीक पाण्याअभावी धोकादायक स्थितीत गेले आहे.
धरणातून पाणी मोठ्या प्रमाणात खाली सोडल्याने टेकवडी या गावची धरणालगत असलेली पाणीपुरवठा विहीर कोरडी पडली. या गावाला टँकरने पाणी पुरवठा करावा लागणार असून तसे पत्र ग्रामपंचायतीने पंचायत समितीला दिल्याचे सांगितले जात आहे. ‘धरण उशाला आणि कोरड घशाला‘ अशी सत्य परिस्थिती धरणालगत असलेल्या अनेक गावांची झाली आहे.
धरणातून पुणे व पिंपरी चिंचवड मनपा तसेच चाकण एमआयडीसी व परिसरातील 19 गावे, आळंदी शहर यांना प्रामुख्याने पाणीपुरवठा होतो. तसेच शेतकर्यांच्या पिकांसाठी पाणी सोडावे लागत आहे. सध्याचा पाणीसाठा आणि पुढचा महिनाभर पाणीवरील योजनासाठी आवश्यक असल्याने पाणी पुरण्याची कमी शक्यता वाटत आहे.
धरणाचा तपशील
एकूण क्षमता : 8.14
टीएमसी सध्याचा साठा : 1.17 टीएमसी (15.26 टक्के)
पाण्याची पातळी : 653.58 मीटर
एकूण साठा : 46.659 दलघमी
उपयुक्त साठा : 33.137 दलघमी
