कडूस: खेडसह शिरूर तालुक्याला वरदान ठरलेल्या चासकमान धरणात केवळ 9.36 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. यंदा 1 मार्चला धरणातून सुरू केलेले आवर्तन सलग 73 दिवस सुरूच आहे. धरणाच्या कालव्याद्वारे 560 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. कोणतेही नियोजन न करता तसेच शेतकर्यांना विश्वासात न घेता पाणी सोडले जात असल्याने शेतकर्यांची पिके पाण्याअभावी संकटात सापडून दुष्काळात तेरावा महिना निर्माण झाल्याचा आरोप शेतकर्यांनी केला आहे. (Latest Pune News)
सध्या चासकमान धरणामध्ये सोमवारी (दि.12) सकाळी 10 वाजता 9.36 टक्के पाणीसाठा शिल्लक असून पाणीपातळी 632.08 मीटर आहे. एकूण साठा 47.27 द.ल.घ.मी. तर उपयुक्त साठा 20.08 द.ल.घ.मी. आहे. यंदा धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन न झाल्याने चासकमान धरणाची पाणीपातळी कमी झाली आहे.
त्यामुळे शेतातील पिके जगविण्यासाठी शेतकर्यांनी धरणात दूरवर पाईप टाकून शेतीपर्यंत पाणी नेण्यासाठी शेतकरी आटापिटा करत आहेत. तसेच शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे अदिवासी भागातील शेतकरी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याच्या भूमिकेत आहेत.
पाण्याअभावी पिके सुकू लागली
चासकमान धरणाच्या बँकवॉटर परिसरातील वाडा, डेहेणे, वाडा, वाळद येथील पाणीसाठा संपुष्टात आला असून शेतकर्यांना आपल्या पिकांना पाणी देणे कठीण झाले झाले आहे. बहुतांशी पिके पाण्याअभावी सुकू लागल्यामुळे दैव देते अण कर्म नेते अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.
गतवर्षीपेक्षा एक टक्का कमी पाणीसाठा
मागील वर्षी याच तारखेला धरणात 10.31 टक्के साठा होता. तर पाणीपातळी 632.43 मीटर, तर एकूण साठा 49.31 द.ल.घ.मी. होता.उपयुक्त साठा 22.12 द.ल.घ.मी. होता. म्हणजेच मागिल वर्षीच्या तुलनेत यंदा धरणात 1 टक्के कमी पाणीसाठा शिल्लक आहे.