

पुणे : पुढारी वृत्तसेवा
येरवडा येथील खुल्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली. गणेश जगन्नाथ तांबे (53, रा. मुंबई) असे आत्महत्या केलेल्या कैद्याचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, 2010 साली विरार येथील खूनप्रकरणात तांबे याला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. तेव्हापासून तो ठाणे मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. तर, मे 2019 पासून तांबे याला येरवडा खुल्या कारागृहात आणण्यात आले. तांबे याला कारागृहातील स्वयंपाकगृहात काम देण्यात आले होते. गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास त्याने कारागृहातील बरॅक क्रमांक दोन मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.
काही वेळाने एक कैदी त्याठिकाणी आल्याने हा प्रकार समोर आला. त्याने तात्काळ ही माहिती वरिष्ठ अधिकार्यांना दिली. तांबे याला वैद्यकीय अधिकार्याकडे तपासणीसाठी नेले असता, त्याला मृत घोषीत करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख, सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे यांनी घटनास्थळी भेट दिली.