पुणे : निरावागजचा प्रदूषणाचा प्रश्न चिघळणार; शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात | पुढारी

पुणे : निरावागजचा प्रदूषणाचा प्रश्न चिघळणार; शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात

सांगवी : पुढारी वृत्तसेवा

प्रदूषणापाठोपाठ आता निरावागज बंधार्‍यातील प्रदूषणाचा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सांडपाण्याचा प्रादुर्भाव निरावागज बंधार्‍यातील पाण्यावर झाला असल्याचा आरोप खांडज येथील शेतकर्‍यांमधून होतो आहे. बंधार्‍यातील पाणी प्रदूषित काळेकुट्ट झाल्याच्या पार्श्वभूमीवर नदीकाठचे शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आले आहेत.

काळ्या ओढ्यातील पुलावर प्रदुषणाच्या विरोधात एकत्र आलेले संतप्त नागरिक.

निरावागज बंधार्‍यातील पाणी केवळ माळेगाव कारखान्याच्या सांडपाण्यामुळेच काळेकुट्ट झाले आहे. साठलेले पाणी प्रदूषित झाल्याने उग्र वास येत असून, नागरिकांचे, जनावरांचे व शेतीचे आरोग्य धोक्यात आले आहे. या सर्व प्रकारामुळे नदीकाठचे शेतकरी संतप्त झाले आहेत. सोमवारी (दि. 14) या प्रदूषणाबाबतचे निवेदन कारखाना प्रशासनाला देण्यात येणार असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.

महासत्ता संकटात: रशिया कर्जबुडवे होण्याची भीती, अनेक देश-वित्तीय संस्थांचा बुडू शकतो पैसा

माळेगाव कारखान्याच्या सांडपाण्याचा प्रादुर्भाव

निरावागज बंधार्‍यातील प्रदूषणाबाबत माळेगाव कारखान्याच्या प्रशासनाला सांगितले असता, काही संचालक म्हणतात हे दूषित पाणी कारखान्याचे नाही, तर हे पाणी शिरवली बंधार्‍यातील असल्याचे सांगितले जाते. जर माळेगाव कारखान्याचे सांडपाणी नाही तर दोन दिवसांपूर्वी कारखान्याच्या अग्निशमन बंबाने काळा ओढा चांगल्या पाण्याने धुण्याचे कारण काय, असा सवाल संतप्त शेतकर्‍यांनी उपस्थित केला आहे. जर लवकर या दूषित पाण्याचा प्रश्न सुटला नाही, तर आत्महत्या करण्याशिवाय आम्हाला पर्याय नसल्याचे संतप्त प्रतिक्रिया शेतकर्‍यांमधून उमटत आहेत.

भोपाळमध्ये मोठी कारवाई; ६ जिहादी दहशतवाद्यांना अटक

यंदाचा गळीत हंगामाच्या सुरुवातीला काही दिवस प्रक्रिया करून पाणी सोडले जात होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कारखान्यातून निघणार्‍या सांडपाण्यावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करताच काळ्या ओढ्यातून सोडले जात आहे. कारखाना निवडणुकीवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खांडज येथील एका कार्यक्रमात कारखान्याच्या पाण्याचा बंदोबस्त करण्याची ग्वाही दिल्यानंतर कारखान्याची सत्ता पवारांच्या ताब्यात देण्यात खांडज येथील शेतकर्‍यांचा मोठा सहभाग आहे. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाला कारखाना प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे.  रविवार (दि. 13) राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर हे खांडज परिसरातील काळा ओढ्याच्या पुलावरून जात असताना होळकर यांच्यापाशी संतप्त प्रतिक्रिया उपस्थित शेतकर्‍यांनी बोलून दाखविली.

crude Oil prices : रशिया- युक्रेनमध्ये वाटाघाटीच्या शक्यतेने कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण

प्रश्न माहिती आहे, योग्य त्या उपाययोजना करू : तावरे

याबाबत माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, हा सर्व प्रकार मला माहिती आहे. या भागातील शेतकरी निवेदन देण्यासाठी कारखाना कार्यस्थळावर येणार आहेत. त्यांच्या मागणीनुसार आवश्यक त्या कायदेशीर उपाययोजना करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Back to top button