पुणे : महिला बाऊन्सरकडून शाळेतच पालकांना मारहाण | पुढारी

पुणे : महिला बाऊन्सरकडून शाळेतच पालकांना मारहाण

पुणे : पुढारी वृत्तसेवा : फी बाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या पालकांना बिबवेवाडी परिसरातील क्लाईन मेमोरियल शाळेत महिला बाऊन्सरकडून मारहाण करण्यात आली आहे. पालक मंगेश गायकवाड यांच्याकडून या प्रकरणी शाळेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून अदखलपात्र गुन्हाही नोंदवण्यात आला आहे.

मुलांच्या शाळेची फी भरण्यासाठी मुख्याध्यापकांकडून आलेल्या पत्राबाबत म्हणणे मांडण्यासाठी सगळे पालक शाळेत गेले होते. त्यावेळी मुख्याध्यापकांना भेटण्याची मागणी करणाऱ्या पालकांना महिला बाऊन्सरने मारहाण केली. पुणे बिबवेवाडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगेश पांडुरंग गायकवाड यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

गायकवाड यांचा मुलगा संबंधित शाळेत शिक्षण घेतो. शाळेच्या मुख्याध्यापकांनी मुलाची फी भरण्यासाठी त्यांना पत्र दिले होते. त्यावर खुलासा देण्यासाठी तक्रारदार आणि इतर काही पालक शाळेत आले होते.

या पालकांनी मुख्याध्यापकांकडे लेखी म्हणणे दिल्यानंतर त्याची पोच पावती मागितली. यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी महिला बाऊंसरला बोलावून मारहाण करायला लावल्याचे गायकवाड यांनी तक्रारीत स्पष्ट केले आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. शाळेच्या आवारातच जर आपले म्हणणे मांडण्यासाठी गेलेल्या पालकांना अशाप्रकारे मारहाण होत असेल, तर हे खूपच धक्कादायक आहे, अशी प्रतिक्रिया अन्य पालकांनी व्यक्त केली आहे.

Back to top button