निरा देवघर धरणातून निरा नदीत 1340 क्युसेकने विसर्ग

निरा देवघर धरणातून निरा नदीत 1340 क्युसेकने विसर्ग

भोर/निरा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यातील भोर, सातारा जिल्ह्यातील फलटण, खंडाळा सोलापूरमधील माळशिरस आदी दुष्काळी तालुक्यांसाठी वरदायिनी असलेले निरा खोर्‍यातील निरा देवघर धरण रविवारी (दि. 20) रात्री 12 वाजता 100 टक्के भरले आहे. त्यामुळे सोमवारी (दि. 21) सकाळी 7 वाजता धरणातून निरा नदीपात्रात एकूण 1340 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदीपात्रालगतच्या गावांतील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन धरणाचे उपविभागीय अभियंता योगेश भंडलकर यांनी केले आहे.

रविवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास 11.91 टीएमसी क्षमता असलेले निरा देवघर धरण 100 टक्के भरले. पावसाचा जोर कायम असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात सतत वाढ होत राहिली. त्यामुळे सोमवारी (दि.21) सकाळी 7 वाजता धरणाच्या दोन दरवाजातून 590 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला. तर वीजनिर्मिती केंद्रातून 750 क्युसेक असा एकूण 1340 क्युसेकने पाण्याचा विसर्ग निरा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. धरणावरील वीजनिर्मिती केंद्र शनिवारपासून सुरू करण्यात आले आहे. वीजनिर्मिती केंद्रातून दररोज 6 मेगावॅट वीजनिर्मिती सुरू झाली आहे.

सोमवारी धरणक्षेत्रात 16 मिलिमीटर पाऊस झाला असून, आतापर्यंत 1607 मिलिमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या वर्षी 13 ऑगस्टला निरा-देवघर धरण 100 टक्के भरले होते. यंदा ते 6 ते 7 दिवस उशिराने 19 ऑगस्ट रोजी भरले. यंदा धरण परिसरात पावसाचे प्रमाण कमी असल्याने भाटघर, गुंजवणी, वीर धरणे भरण्यासाठी विलंब लागला आहे.

सोमवारी (दि. 21) दुपारी 4 वाजेपर्यंत निरा देवघर धरणात 11.729 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. भाटघर धरण 88.35 टक्के भरले असून धरणात 20.763 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. गुंजवणी धरण 82.30 टक्के भरले असून धरणात 3.037 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. तर वीर धरण 74.57 टक्के भरले असून धरणात 7.015 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. दरम्यान, वीर धरणातून निरा उजव्या कालव्यातून 1 हजार 550 क्युसेक्सने व निरा डाव्या कालव्यातून 827 क्युसेक्सने विसर्ग सुरू केल्याची माहिती सहायक अभियंता योगेश भंडलकर यांनी दिली.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news