पिंपरी : संतोष शिंदे : पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारीत येणारी लोकसंख्या आणि क्षेत्रफळ पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तलयाच्या तुलनेत जास्त आहे. पुणे शहर पोलिस दलात 32 पोलिस ठाणी आहेत.
तर, पिंपरी- चिंचवडमध्ये सध्या केवळ 15 पोलिस ठाणी कार्यान्वित आहेत, असे असले तरी देखील पिंपरी- चिंचवडच्याच गुन्हेगारीचा सर्वत्र बोलबाला आहे. गतवर्षी पुण्यात 84 खून झाले आहेत.
तर, पिंपरी- चिंचवडमध्ये 85 जणांच्या खुनांची पोलिस दप्तरी नोंद आहे. त्यामुळे उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी- चिंचवडला हलक्यात घेऊन नका, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
पिंपरी- चिंचवडच्या वाढत्या गुन्हेगारीला अंकुश लावण्यासाठी 15 ऑगस्ट 2018 रोजी शहरात स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली.
आयुक्तालय स्थापनेनंतर पोलिसांनी मोठ्या गुंडांच्या मुसक्या आवळल्या. मात्र, मिसरूड न फुटलेल्या भाईंनी शहर कायम अशांत ठेवले. पादचार्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन, हातातील मोबाईल हिसकावणे.
तसेच, शस्त्राचा धाक दाखवून लुटणे आदी प्रकारातही वाढ झाली. एकंदरीतच उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी- चिंचवड शहरातील 'क्राईम' वाढल्याचे समोर आले आहे.
मागील वर्षात घरफोड्या आणि वाहन चोरीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाल्याची नोंद आहे. मद्यपी टोळक्यांकडून अधूनमधून होणारी तोडफोड देखील पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे.
या पार्श्वभूमीवर 'पुढारी'ने पिंपरी- चिंचवड आणि पुणे शहरातील गुन्हेगारीचा तुलनात्मक आढावा घेतला. त्यावेळी पुणे शहारत 84 खून, तर पिंपरी- चिंचवडमध्ये 85 खून नोंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
याव्यतिरिक्त काही प्रकारचे अपवाद वगळता पिंपरी-चिंचवडची गुन्हेगारी ही पुणे शहरातील गुन्हेगारीला मागे टाकू पाहत असल्याचे समोर आले आहे.
यामागे पोलिस दलातील अपुरे मनुष्यबळ, हे एक महत्वाचे कारण सांगितले जाते. पुणे पोलिस दलात सुमारे साडेआठ हजार इतके मनुष्यबळ उपलब्ध आहे.
तर, पिंपरी- चिंचवडमध्ये केवळ साडेतीन हजारांवर खिंड लढवली जात आहे. याव्यतिरिक्त विभागणी दरम्यान देण्यात आलेल्या साधनसामुग्रीतही मोठी तफावत आहे. त्यामुळे येथील गुन्हेगारांशी दोन हात करताना पोलिसांना मर्यादा येत असल्याचे पहावयास
मिळत आहे.
पुणे शहर पोलिस
दलाकडील सध्याचे मनुष्यबळ
पोलिस अधिकारी – 678
पोलिस कर्मचारी – 7,823
एकूण – 8,501
पिंपरी- चिंचवड पोलिस दलाकडील सध्याचे मनुष्यबळ
पोलिस अधिकारी – 331
पोलिस कर्मचारी – 2,930
एकूण – 3, 261
https://youtu.be/CC-Mfl9S1j8