पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेल्या पुणे मेट्रोचे अखेर येत्या रविवारी (दि.6) उद्घाटन होणार आहे. नागरिकांना 20 रूपयांत पिंपरीतील पिंपरी-चिंचवड महापालिका भवन ते फुगेवाडी असा मेट्रो प्रवास करता येणार आहे.
कोरोना महामारी, लॉकडाऊन, मजूरांची कमतरता, स्टेशनच्या कामांस विलंब आणि तांत्रिक कारणांमुळे मेट्रो सुरू करण्याचे मुहूर्त अनेकदा लांबणीवर पडले.
मेट्रोतून प्रवासी वाहतुक करण्यास कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टीची (सीएमआरएस) परवानगी 6 जानेवारीला मिळाली. मात्र, पुण्यातील परवानगी रखडल्याने मेट्रो सुरू झाली नाही.
पुण्यातील मार्गिकेसही मंजुरी मिळाल्यानंतर मेट्रोच्या उद्घाटनची तारीख पक्की झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी (दि.6) पुण्यात मेट्रोचे उद्घाटन होणार आहे. त्या दिवसापासून पिंपरी ते फुगेवाडी या मार्गावर मेट्रो धावणार आहे.
एका स्टेशनवरून जवळच्या पहिल्या स्टेशनसाठी 10 रूपये तिकीट आहे. त्या पुढील स्टेशनसाठी 20 रूपये तिकीट आहे. नागरिकांना वीस रूपयांत पिंपरी ते फुगेवाडी या 5.8 किलोमीटर अंतर मेट्रोचा प्रवास करता येणार आहे.
रोखीने, डेबीट व के—डीट कार्ड, डिजीटल वॉलेट किंवा ऑनलाइनने तिकीट काढता येणार आहे. बसमध्ये दिले जाते तसे तिकीट आहे.सकाळी आठ ते रात्री 9 या वेळेत एका दिवसात 13 तास मेट्रो धावणार आहे. प्रत्येक 30 मिनिटाच्या अंतराने फेरी असणार आहे.
स्टेशनवर ये-जा करण्यासाठी लिफ्ट, सरकते जिने व पायर्या आहेत. फुगेवाडीपुढील मार्गिका व स्टेशनचे काम पूर्ण झाल्यानंतर टप्पाटप्पाने मेट्रोचे अंतर वाढविले जाणार आहे.
तीन डब्ब्याची (कोच) मेट्रो आहे. त्यात एकूण 1 हजार 200 प्रवासी एकावेळी प्रवास करू शकतात. मेट्रोतून सायकल घेऊनही प्रवास करता येणार आहे.
मेट्रो स्टेशनवर पब्लिक बायसिकल शेअरींगची व्यवस्था असल्याने प्रवाशांना स्टेशनपासून इच्छित स्थळी जाण्यास सायकलचा वापर करता येणार आहे.
त्यासाठी स्मार्ट मोबाईलवर अॅप डाऊनलोड करण्याची गरज आहे. त्याद्वारे भाडे अदा करता येणार आहे. प्रवास संख्या वाढल्यास डब्ब्याची संख्या वाढविले जाणार आहेत. सध्या या मार्गासाठी दोन मेट्रो आहेत.
त्याची देखभाल व दुरूस्ती मदर टेरेसा उड्डाणपुलाजवळील रिव्हर्स लाईन व मेटनन्स लाईन येथील यार्डात केली जाणार आहे.
पुणे मेट्रो रविवारपासून पिंपरी-चिंचवड शहरवासीयांच्या सेवेत सुरू होत आहे. अनेक वर्षांपासून असलेली नागरिकांचे स्वप्न काही दिवसांत पूर्ण होणार आहे.
टप्पाटप्याने फुगेवाडीपुढील मार्ग व स्टेशन वाहतुकीस खुले केले जाणार आहे. नागरिकांना मेट्रोतून सुरक्षितपणे प्रवास करता येणार आहे, असे महामेट्रोचे महाव्यवस्थापक डॉ. हेमंत सोनवणे यांनी सांगितले.
पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील पिंपरी ते फुगेवाडी या मार्गावर मेट्रो सुरू होणार आहे. हा सर्व मार्ग एलिव्हेटेड आहे. रेंजहिल्सपुढील मार्ग भुयारी आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका भवन, संत तुकारामनगर, नाशिक फाटा, कासारवाडी व फुगेवाडी या पाच स्टेशनवर नागरिकांना प्रवास करता येणार आहे.
संत तुकारामनगर स्टेशन हे एसटी आगारास जोडले आहे. तर, नाशिक फाटा स्टेशन कासारवाडी रेल्वे स्टेशनला जोडले आहे. त्यामुळे प्रवाशांना इतर सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचा लाभ घेता येणार आहे.
https://youtu.be/CC-Mfl9S1j8