

पुणे : पुढारी वृत्तसेवा : टुरिस्ट गाडी असल्याचा बहाणा करून वेश्यागमनासाठी महिला पुरविणार्या व शहरातील येरवडा आणि विमाननगर परिसरात सेक्स रॅकेट चालविणार्या परराज्यातील टोळीचा सामाजिक सुरक्षा विभागाने पर्दाफाश केला. यावेळी दोन तरूणींची सुटका करताना सुत्रधारासह दलालाला बेड्या ठोकण्यात आल्या. कुलदीप प्रसाद मोहनप्रसाद महतो (26, रा. जी. बी. डोंगरीपाडा, बुध्द विहार जवळ, ठाणे मुळ रा. झारखंड) आणि जयशंकर प्रसाद रमेश साव (20, रा. जकॉब सर्कल मुंबई, मुळ रा. झारखंड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
टुरिस्ट गाडीचा उपायोग वेश्यागमनासाठी होत असून, त्यांचे येरवडा आणि विमानतळ परिसरात सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती सोमवारी सामाजिक सुरक्षा विभागाच्या कर्मचार्यांना मिळाली. त्यानुसार विभागाचे वरिष्ठ निरीक्षक अरविंद माने यांनी दोन्ही संशयीत आरोपींचा नंबर मिळवून त्यावर बनावट गिर्हाईकास बोलण्यास सांगितले. त्यांनी विमाननगर मधील साकारे नगर येथील ईस्ट फिल्ड या हॉटेलमध्ये दोन रूम बुक करण्यास सांगितले. त्याप्रमाणे बनावट ग्राहकाने दोन रूम बुक केल्या. त्यानंतर वरिष्ठ निरीक्षक माने उपनिरीक्षक श्रीधर खडके, हवालदार राजेंद्र कुमावत, राजश्री मोहिते, मनिषा पुकाळे, पोलिस नाईक अण्णा माने, प्रमोद मोहिते, हणमंत कांबळे यांनी सापळा रचून टुरिस्ट गाडीत आलेल्या दोन पिडीत महिलांची सुटका करत दोन संशयीत आरोपींना अटक केली.
संशयीत आरेापी महतो आणि साव यांच्याकडे करण्यात आलेल्या तपासात त्यांनी टुरिस्ट गाडी चालवत असल्याचे भासवून परराज्यातील महिलांकडून जबरदस्तीने वेश्या व्यावसायास करून घेत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त रविंद्र शिंसवे, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या पथकाने ही कारवाई केली.