

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शहरातील निगडी-प्राधिकरण, चिंचवड, भोसरी व जुनी सांगवी येथील मंदिरात बुधवारी (दि.23 ) संत गजानन महाराजांचा 144 वा प्रगटदिन विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
मंदिरामध्ये 'गण गण गणात बोते'च्या जल्लोषासह दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. यावर्षी गजानन महाराजांच्या प्रगटदिनाची तारीख आणि तिथी ही एकाच दिवशी आल्याने भाविकांमध्ये अधिकच उत्साह दिसून येत होता.
चिंचवड येथील लिंक रोडवरील मंदिरात पहाटे केशरयुक्त दुधाने महाराजांना अभिषेक घालण्यात आला. यानंतर पहिल्या अध्यायाचे वाचन करून वारकरी सांप्रदायिक कीर्तन कुंडलिक महाराज देहुकर यांनी सादर केले.
दुपारी बाराच्या सुमारास महाराजांच्या प्रगटवेळी श्रींच्या नामाचा गजर करण्यात आला. सायंकाळी मंत्राचा जागर करून नित्याची आरती करण्यात आली. रात्री सादर करण्यात आलेल्या भावगीत आणि भक्तिगीतांच्या कार्यक्रमाला भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. रात्री पसायदानाने कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली.
कोविडच्या प्रादुर्भावामुळे दरवर्षी वाटप होणार्या पिठल-भाकरीच्या महाप्रसादाचा कार्यक्रम रद्द करून त्याऐवजी पॅकिंग केलेल्या प्रसादाचे वाटप करण्यात आले.
त्यासोबतच दरवर्षीप्रमाणे होणारी पालखी मिरवणूक देखील टाळण्यात आली होती. यावेळी मंदिराला फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती. त्यामुळे मंदिर परिसर उजळून निघाला होता.
या कार्यक्रमाचे नियोजन विश्वनाथ धनवे, किशोर कदम, प्रताप भगत, श्रीपाद जोशी, विष्णू पूर्णये, दत्तात्रय सावकार, संजय खलाटे, देविदास कुलथे, श्रीकांत आणावकर, महेश गोखले व सचिन बलकवडे यांनी केले.