

संतोष चोपडे
भवानी पेठ : तीन प्रभागांची मोडतोड करून नवीन प्रभाग झाल्याने विद्यमान नगरसेवकांना उमेदवारी मिळवून जिंकण्यापर्यंत शर्थीचे प्रयत्न करावे लागतील. जुन्या प्रभागात भाजपचे पाच, राष्ट्रवादीचे दोन, तर सेनेचा एक नगरसेवक आहे. प्रभागरचनेतील बदलाने काही नगरसेवक लगतच्या प्रभागात लढणार आहेत. त्यामुळे नवीन चेहर्यांना संधी मिळू शकते. कसबा मतदारसंघातील या नव्या प्रभागात महाविकास आघाडी झाल्यास भाजपविरोधात अटीतटीची लढत होऊ शकेल.
जुना प्रभाग क्रमांक 17 (रास्ता पेठ -रविवार पेठ), प्रभाग क्रमांक 18 (खडकमाळ आळी -महात्मा फुले पेठ)सह प्रभाग क्रमांक 19 (लोहियानगर -काशेवाडी)च्या काही भागाचा समावेश नवीन प्रभाग क्रमांक 28 (महात्मा फुले स्मारक- टिंबर मार्केट)मध्ये केला आहे. कसबा मतदारसंघातील या प्रभागात दोन राष्ट्रवादी, एक शिवसेना, तर भाजपाचे पाच नगरसेवक सन 2017 मध्ये निवडून आले होते. यातील जुन्या प्रभाग 18 मधील नगरसेवक अजय खेडेकर व नगरसेवक सम्राट थोरात लगतच्या प्रभागातून लढणार आहेत. नगरसेविका आरती कोंढरे व नगरसेविका विजयालक्ष्मी हरिहर येथूनच निवडणूक लढविणार आहेत.
प्रभाग क्रमांक 17 मधून भाजप नगरसेविका सुलोचना कोंढरे एकमेव भाजपच्या नगरसेविका निवडून आल्या होत्या. त्यामुळे नवीन प्रभागातून आपल्यालाच उमेदवारी मिळेल असा दावा त्यांचे पती तेजेंद्र कोंढरे यांच्याकडून केला जात आहे. तर शिवसेना नगरसेवक विशाल धनवडे व राष्ट्रवादीच्या नगरसेविका लक्ष्मी आंदेकर, नगरसेवक वनराज आंदेकर हे आघाडी असो अथवा नसो, ताकदीने प्रभागातून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत.
या भागात मराठा, पद्मसाळी समाज, जैन समाज अधिक आहे. व्यापारी भाग असलेल्या या प्रभागात कपडा, धान्य, साड्या ट्रान्सपोर्ट टिंबर मार्केट पत्रा बाजार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे अरुंद रस्त्यावरील वाहतूक कोंडी व पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. महाविकास आघाडी झाल्यास तीन विद्यमान नगरसेवक लढणार की, काँग्रेसलाही संधी मिळणार? मागच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराने भाजप उमेदवारास टक्कर दिली होती, त्यामुळे आगामी निवडणुकीत मैत्रीपूर्ण स्वतंत्र लढल्यास प्रमुख उमेदवारांतील लढाई रंगतदार होईल. आरक्षणानंतर नेमके उमेदवार समोर येऊन राजकीय समीकरणात बदल होईल.
या प्रभागातून इच्छुक उमेदवारांमध्ये राष्ट्रवादीकडून नगरसेवक वनराज आंदेकर, नगरसेविका लक्ष्मी आंदेकर, शिवानी माळवदकर, विजय ढेरे, चेतन मोरे, किरण पोकळे, गोरख भिकुले, अजय दराडे, राजेंद्र घोलप, काँग्रेसकडून कान्होजी जेधे, वीरेंद्र किराड, सौरभ अमराळे, मिलिंद कांची. भाजपकडून नगरसेविका सुलोचना कोंढरे, नगरसेविका विजयालक्ष्मी हरिहर, राजेंद्र काकडे, नामदेव माळवदे, नगरसेविका आरती कोंढरे, शंतनू कांबळे, विष्णू हरिहर, श्रीकांत चव्हाण, विजय कोठावळे, देवा देवकुळे. शिवसेनेकडून नगरसेवक विशाल धनवडे, राजेश बारगुजे, सागर पेटाडे, मेघा पवार, रूपेश पवार, वैशाली गायकवाड तर मनसेकडून माजी नगरसेविका सुशीला नेटके, आरती सहाणे, प्रवीण क्षीरसागर, तेजस माने, आकाश सुरे. ज्योती खुटवड.
संत कबीर चौक, उदयकांत आंदेकर चौक, डावरे चौक, मंडई, कोटणीस दवाखाना, फडगेट पोलिस चौकी, माशे आळी, फायर बि—गेड, सोनवणे रुग्णालय, गंज पेठ, लोहियानगर, बिडी कामगार, टिंबर मार्केट, कामगार मैदान, गुरुवार, रविवार-भवानी पेठ, नाना पेठ, गणेश पेठ.