शंकर कवडेे
पुणे : मिठाई, तसेच बेकरी उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणार्या वनस्पती तुपाचे (डालडा) उत्पादन घटल्याने बाजारात तुपाचे भाव वधारले आहेत. बाजारात दाखल होत असलेल्या मालाच्या तुलनेत तुपाला मागणी मोठी असल्याचे चित्र आहे. परिणामी, तुपाच्या भावात महिनाभरात 15 किलोमागे 60 ते 260 रुपयांनी वाढ झाली आहे.
देशातील तेल व्यावसायिकांकडून इंडोनेशिया व मलेशिया येथून कच्च्या पामतेलाची आयात करण्यात येते. कच्चे पामतेल रिफाईंड करताना त्यातून स्टेअरिन बाजूला केले जाते. याच स्टेअरिनचा वापर वनस्पती तूप करण्यासाठी होतो. सध्या कच्चे व रिफाईंड पामतेल यांच्या आयात शुल्कात फार कमी फरक आहे. त्यामुळे तेल उत्पादकांकडून रिफाईंड तेल खरेदी करण्यास प्राधान्य दिले गेले आहे. कच्च्या पामतेलाची आयात घटल्याने त्याचा परिणाम वनस्पती तुपाच्या उत्पादनावर झाला आहे. कोरोनानंतर सर्वकाही सुरळीत झाल्याने बेकरी व मिठाई व्यावसायिकांकडून वनस्पती तुपाला मागणी वाढली आहे. त्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने भावात मोठी वाढ झाली आहे. मागील महिन्यात 15 किलोच्या डब्याचे दर 1 हजार 840 ते 2 हजार 240 इतके होते. सध्या ते 2 हजार 100 ते 2 हजार 300 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
तेल उत्पादक कंपन्यांकडून इंडोनेशिया तसेच मलेशिया येथून कच्च्या पामतेलाची आयात करून ते रिफाईंड करण्यात येते. उत्पादन घटल्याने या देशांकडून कच्च्या पामतेलाच्या निर्यातीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. या क्षेत्रात कामगारांचा तुटवडा असून, कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी परवाना पध्दतीचा अवलंब करण्यात येत आहे. रिफाईंड पामतेलापेक्षा कच्च्या पामतेलाची किंमत जास्त असून, त्यांच्या आयात शुल्कातही फार कमी फरक आहे. परिणामी, देशात कच्चे तेल आणून ते रिफाईंड करण्यापेक्षा परदेशातूनच रिफाईंड पामतेल आणण्याकडे उत्पादकांचा कल आहे.
शहरात रोज जवळपास 50 टन वनस्पती तुपाचा खप होतो. बेकरी व मिठाई व्यावसायिकांकडून वनस्पती तुपाला सर्वाधिक मागणी असते. सध्याची परिस्थिती जून ते जुलैपर्यंत कायम राहील, अशी शक्यता आहे.
– कन्हैयालाल गुजराथी, खाद्यतेलाचे व्यापारी