पुणे : नव्या प्रभागरचनेने अनेक इच्छुकांचा झाला ‘पोपट’

पुणे : नव्या प्रभागरचनेने अनेक इच्छुकांचा झाला ‘पोपट’
Published on
Updated on

हिरा सरवदे

पुणे : महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांनी मागील वर्षभरात विविध उपक्रम आणि धार्मिक, पर्यटन सहलींचे आयोजन केले. या माध्यमातून मतदारराजावर प्रभाव टाकण्याचा इमाने-इतबारे प्रयत्न केला. मात्र, प्रभागरचनेत झालेल्या फोडाफोडीमुळे अनेकांचा 'पोपट' झाला. अशाप्रकारे भ्रमनिरास झालेल्यांना आता आरक्षणाची प्रतीक्षा असून, आरक्षणानंतर पुन्हा खिसा रिता करावा लागणार आहे.

कमी वेळेत मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान

लहान-मोठ्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून विद्यमान लोकप्रतिनिधी आणि इच्छुकांकडून विविध उपक्रम राबवले जातात. निवडणूक जशी जवळ येईल, तसे या उपक्रमांच्या माध्यमातून आपले नाव जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचविण्याचा, जास्तीत जास्त चर्चा करण्याचा प्रयत्न केला जातो. शिवाय या ना त्या कारणांनी मतदारांना भेट वस्तू (गिफ्ट) देऊन त्यांच्यावर छाप पाडण्याचा प्रयत्न केला जातो. इतर निवडणुकांच्या तुलनेत महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अशा उपक्रमांचे पेवच फुटते. मागील दोन वर्षे कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये गेल्याने विकासकामे आणि सार्वजनिक कार्यक्रमांवर मर्यादा आल्या होत्या. त्यातच पालिकेची पंचवार्षिक निवडणूक जवळ आल्याने हाती राहिलेल्या वेळेत जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे, त्यांच्यावर छाप पाडण्याचे आव्हान विद्यमान नगरसेवक आणि इच्छुकांसमोर आहे. हे आव्हान पेलण्यासाठी निर्बंध असतानाही इच्छुकांकडून विविध उपक्रमांचे आयोजन केले गेले.

दिवाळी, मकर संक्रांतीचे 'गिफ्ट' गेले वाया!

दिवाळी आणि मकर संक्रांतीच्या निमित्ताने शहराच्या सर्वच भागांत स्थानिक नगरसेवक, नगरसेविका आणि इच्छुकांकडून हळदी-कुंकू आणि सांस्कृतिक, विविध शिबिरे आदींचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमांसाठी महिलांना जमवून त्यांना गिफ्ट आणि साड्या देण्यात आल्या. प्रभागातील ज्या महिला कार्यक्रमाला येऊ शकल्या नाहीत, मात्र मतदार आहेत, अशा महिलांना घरपोच गिफ्ट पाठविण्यात आली. याशिवाय क्रिकेट स्पर्धा, धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांच्या सहलींचेही आयोजन करण्यात आले. मात्र, महापालिकेच्या निवडणुकीसाठी 1 मार्च रोजी नवीन प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध झाला आणि अनेकांचा 'पोपट' झाला.

इच्छुकांनी राबविले असे उपक्रम
इच्छुकांनी राबविले असे उपक्रम

ज्या परिसरात विविध उपक्रम राबविले, स्पर्धा घेतल्या, लाखो रुपये खर्चून धार्मिक सहली काढल्या, तो परिसर दुसर्‍याच प्रभागाला जोडला गेला आणि नवीनच परिसर व मतदार वाट्याला आले. निवडणुकीपूर्वीच खिशाला झळ लागलेल्यांना आता आरक्षणाची प्रतीक्षा आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर आणि चित्र स्पष्ट झाल्यानंतर पुन्हा मतदारांना आकर्षिक करण्यासाठी आणि त्यांच्यावर प्रभाव टाकण्यासाठी लाखो रुपयांचा चुराडा करावा लागणार आहे.

नवीन प्रभागात फ्लेक्सबाजी, विविध उपक्रम

प्रभागरचनेचा अंदाज आलेल्या आणि पक्षाची उमेदवारी आपणासच मिळणार, उमेदवारी नाही मिळाली तरी अपक्ष किंवा इतर पक्षाकडून लढण्याचा निश्चय केलेल्यांनी नवीन प्रभागात फ्लेक्सबाजी व विविध उपक्रम राबविण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये अनेकांनी युनिव्हर्सल पास, ई-श्रमकार्ड, आधार कार्ड दुरूस्ती असे उपक्रम राबविण्यास प्राधान्य दिले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news