पुणे : पुढारी वृत्तसेवा
अनमोल वारसा जतन करा, विकासासाठी वनीकरण आदी वाक्यांसह वृक्षारोपण करणार्या वन विभागाकडूनच वृक्षतोडीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले. पाचगाव पर्वती आणि तळजाई परिसरामध्ये बेसुमार वृक्षतोड केली जात आहे.पर्वती किंवा तळजाई अभयारण्याच्या परिसरामध्ये अज्ञात व्यक्ती तसेच काही स्थानिक नागरिकांकडून वृक्षांची तोड होत असून त्यामध्ये पुणे महापालिकेचा उद्यान विभाग आणि पुणे वन विभाग यांच्याकडून दुर्लक्ष होत आहे.
वन विभागाकडे याबाबत विचारणा केल्यास आमच्या हद्दीमध्ये संबधित भाग नसल्याचे सांगून ही जबाबदारी पुणे मनपाची असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, अशा प्रकारची होणारी बेकायदा वृक्षतोड थांबणार का असा प्रश्न पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला आहे.
पाचगाव पर्वती किंवा तळजाई अभयारण्याच्या परिसरात अवैध वृक्षतोडीविषयी अनेकवेळा मदतवाहिनीवर तक्रार नोंदविली आहे. पण त्यावर एकदाही कार्यवाही झाली नाही. या वनक्षेत्रातून रोज अंदाजे 500 ते 700 किलो वजनाची वनसंपदा तोडली जात आहे. ही तोड मुख्यतः शेजारी असलेल्या जनता वसाहत येथील नागरिकांकडून होत असते. याबाबत पुणे वनविभागाला इमेलद्वारे अनेकदा तक्रार केली आहे तसेच पुणे वन विभागाचे मानद वनसंरक्षक यांनाही याबाबत कळविले आहे, पण त्याचाही काहीच उपयोग झालेला नाही. वन विभागाचे अधिकारी केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत.
– संजय नाईक (पर्यावरणप्रेमी)
तळजाईवर असलेल्या आतील उद्यानामध्ये अशा प्रकारची कोणतीही वृक्षतोड झालेली नाही. तळजाईच्या पायथ्याशी किंवा आजूबाजूच्या पसिरात वृक्षतोड होत असेल तर संबंधित जागा ही पुणे मनपाच्या हद्दीत येत आहे. मात्र, पुन्हा एकदा वृक्षतोडीबाबत माहिती घेऊन संबंधितांवर कार्यवाही करू.
–प्रदीप संकपाळ,वनसंरक्षक, पुणे वन विभाग