

पुणे : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेच्या प्रारूप प्रभागरचनेवर विक्रमी हरकती-सूचना नोंदविण्यात आल्या आहेत. अखेरच्या दिवशी तब्बल 2 हजार 804 हरकती आल्या असून, एकूण हरकती-सूचनांची संख्या 3 हजार 596 इतकी झाली आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी तयार झालेली प्रारुप प्रभागरचना 2 फेब्रुवारीला जाहीर झाली. त्यावर हरकती-सूचना नोंदविण्यासाठी 14 फेब्रुवारीपर्यंतची अखेरची मुदत होती. त्यानुसार सोमवार अखेरपर्यंत एकूण 3 हजार 596 इतक्या विक्रमी संख्येने हरकती आल्याचे निवडणूक कार्यालयाकडून सांगण्यात आले.
2017 च्या पालिका निवडणुकीच्या प्रभागरचनेवर 1 हजार 102 इतक्या हरकती आल्या होत्या. आता मात्र या संख्येत अडीचपट वाढ झाली आहे. या हरकती-सूचनांवर सुनावणी घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम यांंच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि महापालिका आयुक्त हे चार सदस्य अथवा त्यांचे प्रतिनिधी सुनावणी घेणार आहेत. ही सुनावणी 24 फेब्रुवारीपासून होणार आहे. त्यानंतर 2 मार्चपर्यंत या हरकती-सूचनांचा अहवाल आयोगाला सादर करण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर आयोगाकडून अंतिम प्रभागरचना जाहीर होईल.
प्रभाग क्र. 26 भीमनगर-रामटेकडी या प्रभागरचनेवर अखेरच्या दिवशी तब्बल 1 हजार हरकती-सूचना नोंदविण्यात आल्याचे सांगण्यात आले. प्रभाग क्र. 16 गोखलेनगर-पंचवटी या प्रभागावर 316 हरकती आल्या आहेत. काही निवडक प्रभागांवर शेकडोच्या संख्येने हरकती आल्याने हरकतींची संख्या वाढल्याचे सांगण्यात आले.
1) औंध-बाणेर – 35, 2) भवानी पेठ – 23, 3) बिबवेवाडी – 68, 4) धनकवडी-सहकारनगर – 289, 5) ढोले-पाटील रोड – 113, 6) हडपसर-मुंढवा – 88, 7) कसबा-विश्रामबाग – 253, 8) कोंढवा-येवलेवाडी – 51, 9) कोंथरूड-बावधन – 77, 10) नगर रोड-वडगाव शेरी – 156, 11) शिवाजीनगर घोले रोड – 12, 12) सिंहगड रोड – 25, 13) वानवडी-रामटेकडी – 1034, 14) वारजे- कर्वेनगर – 62, 15) येरवडा-कळस – 15, 16) निवडणूक कार्यालय – 1295
हे ही वाचलं का ?