

कडूस / खेड: खेड- आळंदी विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांसाठी 118 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीसाठी आमदार बाबाजी काळे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. हा निधी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री अजित पवार, पीएमआरडीए आयुक्त योगेश म्हसे यांच्या सहकार्यातून आणि माझ्या पाठपुराव्यामुळे मिळाला आहे, असे आ. बाबाजी काळे यांनी सांगितले.
या निधीतून धामणे फाटा ते कोये, कोंहिडे फाटा ते कडूस, कडूस ते किवळे, भोसेगाव ते राज्यमार्ग 55 पर्यंत व वडगाव घेनंदपर्यंत, किवळे ते आंबेठाण असे रस्ते सिमेंटचे करण्यासाठी 44 कोटी रुपयांचा निधी तर चाकण-तळेगाव रस्ता ते देहू-येलवाडी रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यासाठी 74 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या कामांची निविदा प्रक्रिया सुरू असून लवकरच या रस्त्यांची कामे सुरू होणार असल्याचेही आ. काळे यांनी सांगितले. (Latest Pune News)
अजित पवार यांच्या मार्गदर्शनामुळे निधी मिळाला : दिलीप मोहिते पाटील
खेड तालुक्याच्या पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझ्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे रस्त्यांसाठी हा निधी मिळाला असल्याचे माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनीही सांगितले आहे.
या निधीतून तालुक्यात जे सिमेंट काँक्रीट रस्ते बांधले जाणार आहेत, त्यांची दहा वर्षे देखभाल आणि दुरुस्ती ’पीएमआरडीए’ च्या माध्यमातून केली जाणार आहे, असेही मोहिते-पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, या प्रकल्पांमुळे खेड तालुक्यातील ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था सुधारणार असून, नागरिकांना दर्जेदार आणि कायमस्वरूपी रस्त्यांचा लाभ मिळणार आहे.
या रस्त्यांच्या बांधकामामुळे तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेला गती मिळेल. या प्रकल्पांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. हा प्रकल्प खेड तालुक्यातील नागरिकांसाठी मोठी उपलब्धी ठरणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खेड-आळंदी मतदारसंघाच्या विकासाकडे लक्ष असून माझा त्यासाठी सतत पाठपुरावा सुरू असतो.