पुणे : सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल होणार दुमजली!

उड्डाणपूलासाठी सर्वेक्षणाचे सुरू असलेले काम (संग्रहित छायाचित्र)
उड्डाणपूलासाठी सर्वेक्षणाचे सुरू असलेले काम (संग्रहित छायाचित्र)

पुणे : पुढारी वृत्तसेवा

सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यानंतर आता हा पूल दुमजली करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे आला आहे.
विशेष म्हणजे हा पूल दुमजली करण्याच्या केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या सूचनेवर प्रशासनाने ते शक्य नसल्याचा अभिप्राय दिला होता. आता पुन्हा सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी यासंबधीचा प्रस्ताव दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून फनटाइम ते राजाराम पुलापर्यंत सुमारे 2 किलोमीटरचा उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी 118 कोटींचा खर्च येणार आहे. या पुलाच्या कामालाही सुरवात झाली आहे. असे असतानाच आता या मार्गावर भविष्यात मेट्रो होणार असल्याने उड्डाणपूल तसेच मेट्रोच्या खांबामुळे सिंहगड रस्त्यावर जागाच राहणार नाही.

त्यामुळे उड्डाणपूल आणि मेट्रोचे खांब एकच करावेत, असा प्रस्ताव भाजप नगरसेविका मानसी देशपांडे व सुनीता गलांडे यांनी स्थायी समितीला दिला आहे. त्यामुळे आता या पुलाचा आराखडा बदलणार आहे, परिणामी कामाचा खर्च वाढण्यासोबतच पुलाचे कामही रेंगाळण्याची भीती आहे. विशेष म्हणजे या पूलाच्या भूमिपूजनावेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांनीही हा पूल मेट्रोचा विचार करून दुमजली करावा, अशी सूचना केली होती. त्यावर पालिकेने अभ्यास करून दुमजली पूल शक्य नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, आता मात्र पुन्हा हा प्रस्ताव आल्याने स्थायी समिती त्यावर काही निर्णय घेणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news