‘चला बोलू या’ समुपदेशनाने जोडली जात आहेत दुभंगलेली मनं

समुपदेशनानंतर 117 जोडपी पुन्हा एकत्र
समुपदेशनानंतर 117 जोडपी पुन्हा एकत्र
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा

वैवाहिक कलह होऊन निर्माण झालेले मतभेद व गैरसमज दूर करून संसार सुरळीत करण्यात न्यायालयातील 'चला बोलू या' उपक्रम फायदेशीर ठरत आहे. मागील चार वर्षांत या उपक्रमाअंतर्गत 1 हजार 101 प्रकरणे दाखल झाली. त्यापैकी 221 प्रकरणांत समुपदेशकांना तडजोड करण्यात यश आले असून, 49 प्रकरणे अद्याप प्रलंबित आहेत.

पत्नी-पत्नींमध्ये किरकोळ कारणांमुळे निर्माण झालेले वैवाहिक व कौटुंबिक स्वरूपाचे वाद प्रत्यक्षात न्यायालयात दाखल होण्यापूर्वी संपुष्टात यावेत, या दृष्टीने न्यायालयाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याअंतर्गत ऑगस्ट 2018 मध्ये 'चला बोलू या – परस्पर संमतीने वाद मिटवू या' या समुपदेशन केंद्राची स्थापना करण्यात आली.

महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, मुंबईकडून हा उपक्रम पहिल्यांदा बांद्रा कौटुंबिक न्यायालयात सुरू करण्यात आला. त्यापाठोपाठ पुण्यात हा उपक्रम सुरू झाला. यामध्ये पती-पत्नीचे मोफत समुपदेशन करून त्यांना पुन्हा एकत्र आणण्याचा किंवा त्यांच्यादरम्यान परस्पर संमतीने तडजोड करण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला. केंद्राच्या स्थापनेपासून आजपर्यंत केंद्रात 1 हजार 101 प्रकरणे दाखल झाली. समुपदेशनानंतर 117 जोडपी पुन्हा एकत्र नांदण्यासाठी गेली, तर 104 जोडप्यांनी परस्पर संमतीने घटस्फोटाची तडजोड केली.

या वादांवर होतो तडजोडीचा प्रयत्न 

दाखलपूर्व विवाहविषयक पती-पत्नीमधील वाद, पोटगीशी संबंधित वाद, अज्ञान मुलांसंदर्भातील ताब्याचे वाद, पती-पत्नीच्या मालमत्तेचे वाद याव्यतिरिक्त आई, वडील व मुले यांच्यातील पोटगी किंवा सांभाळ करण्याबाबतचे वाद आदी प्रकरणांमध्ये पक्षकारांचे मोफत समुपदेशन करून त्यांना पुन्हा एकत्र आणण्याचा किंवा परस्पर संमतीने तडजोड करण्याचा प्रयत्न केला जातो.

221 प्रकरणांत तडजोड 

'चला बोलू या' केंद्रात समुपदेशकांकडून पक्षकारांना स्वखुशीने तडजोडीचा पर्याय निवडण्याचे स्वातंत्र्य दिले जाते. अनेक प्रकरणात एकरकमी पोटगीच्या तडजोडीही केल्या आहेत. पक्षकारांदरम्यान तडजोड झाल्यास कायदेशीरदृष्ट्या तडजोडपत्र तयार करण्यासाठी पक्षकारांना वकिलांची मदत दिली जाते.

– सुभाष काफरे,
प्रमुख न्यायाधीश, कौटुंबिक न्यायालय

येथे करा संपर्क : शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयातील तिसर्‍या मजल्यावर खोली क्र. 3 येथे हे केंद्र आहे. सकाळी साडेदहा ते सायंकाळी सहा या वेळेत नागरिकांना येथे संपर्क साधता येईल. याखेरीज जिल्हा न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे 8591903612 या क्रमांकावर नागरिकांनी संपर्क साधावा.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news