

ज्ञानेश्वर बिजले
पुणे : कसबा पेठ मतदारसंघात भाजपचा वरचष्मा असला, तरी पूर्व भागातील पेठांमध्ये काही ठिकाणी काँग्रेसबरोबरच शिवसेनेचीही चांगली पकड आहे. महाविकास आघाडीने चांगले उमेदवार निवडल्यास प्रभाग क्रमांक 29 (खडकमाळ आळी- महात्मा फुले मंडई) मध्ये ते भाजपसमोर आव्हान उभे करू शकतील. सर्वच पक्ष स्वतंत्र लढल्यास येथे मतविभागणीमुळे अटीतटीच्या लढतीची शक्यता आहे.
जुना प्रभाग क्रमांक 15 (शनिवार पेठ-सदाशिव पेठ) आणि जुना प्रभाग क्रमांक 18 (खडकमाळ आळी-महात्मा फुले पेठ) यातील प्रत्येकी पन्नास टक्क्यांच्या आसपास भाग मिळून नवा प्रभाग क्रमांक 29 तयार झाला आहे. जुन्या दोन्ही प्रभागांतील आठही नगरसेवक भाजपचे आहेत.
जुन्या प्रभाग 15 मधील हेमंत रासने, मुक्ता टिळक, राजेश येनपुरे, गायत्री खडके हे चारही नगरसेवक या नवीन प्रभागांतून लढण्यास इच्छुक नाहीत. प्रभाग 18 मधील अजय खेडेकर, सम्राट थोरात, आरती कोंढरे, विजयालक्ष्मी हरिहर या चौघांपैकी कोणाला पुन्हा लढण्याची संधी द्यायची ते भाजपला ठरवावे लागेल. भाजपचे दिलीप काळोखे, प्रमोद कोंढरे, इंदिरा निगडे, दिलीप पवार, थोरवीणा येनपुरे, सविता काळोखे, नितीन पंडित यांसह काही कार्यकर्ते इच्छुक आहेत. या प्रभागात भाजपकडून काही नव्या चेहर्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
गेल्या निवडणुकीत प्रभाग 15 मध्ये मनसेचे उमेदवार तीन जागांवर दुसर्या क्रमांकावर होते. प्रभाग 18 मध्ये अधिक संख्येने उमेदवार उभे राहिल्याने विरोधकांच्या मतांची विभागणी मोठ्या प्रमाणात झाली. काँग्रेसने येथे दोन जागांवर चांगली लढत दिली होती. शिवसेना व मनसेच्या कार्यकत्र्यांचेही या भागात जाळे आहे.
प्रभाग क्रमांक 18 मध्ये गेल्या वेळी चारही जागा काँग्रेसने लढविल्या होत्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नव्हते. या वेळी काँग्रेसकडून अजित दरेकर, संजय बालगुडे, कमल व्यवहारे, नारायण चव्हाण, बंडू शेडगे, राकेश नामेकर आदी इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सूरज अण्णा थोरात, रूपाली पाटील, राजेंद्र देशमुख, सुनील खाटपे आदींची नावे चर्चेत आहेत. शिवसेनेकडून चंदन साळुंखे, संदीप गायकवाड, बाळासाहेब मालुसरे, सुलभा तळेकर, अनुपमा मांगडे इच्छुक आहेत. एमआयएम पक्षाच्या उमेदवारांनीही गेल्या निवडणुकीतील चारही जागांवर प्रत्येकी तीन हजारांच्या आसपास मते मिळविली होती.
महाविकास आघाडी झाल्यास, त्यांना उमेदवार ठरविताना जागांनिहाय पक्षांची निवड करणे जिकिरीचे ठरेल, मात्र ते एकत्रितरीत्या भाजपपुढे निश्चितपणे आव्हान उभे करतील. आघाडी न करता, सर्व पक्ष स्वतंत्रपणे लढल्यास, मतविभागणीमुळे लढती अटीतटीच्या झाल्या तरी, काही जागांवर भाजपला फायदा होईल, असे सध्याचे चित्र आहे.
खडकमाळ आळी, महात्मा फुले मंडई, संत मदर तेरेसा चर्च, मामलेदार कचेरी, राजा दिनकर केळकर संग्रहालय, घोरपडे उद्यान, स्वारगेट पोलिस कॉलनी, सुभाषनगर, शुक्रवार पेठ, गुरुवार पेठ, घोरपडी पेठ, गंज पेठ हा शहराचा मध्यवर्ती भाग या प्रभागात येतो. शिवाजी रस्त्यावरील बेलबाग चौकापासून तुळशीबागेतून विश्रामबाग वाडा, बाजीराव रस्त्याने महाराणा प्रताप उद्यानाला वळून स्काऊट ग्राऊंड, स.प. महाविद्यालय, तेथून टिळक रस्त्याने स्वारगेटवरून शंकरशेट रस्ता, तेथून डावीकडे वळून घोरपडे उद्यानाला वळसा घालत महात्मा फुले स्मारक, तेथून पुढे मीठगंज पोलिस चौकी ते फडगेट पोलिस चौकीदरम्यानचा रस्ता, तेथून शिवाजी रस्त्याने बेलबाग चौक यामधील परिसर या प्रभागात येतो.