पुणे : पुढारी वृत्तसेवा
ओला, उबेर, रॅपिडो व इतर अॅपद्वारे सुरू असलेली बेकायदा दुचाकी प्रवासी सेवा बंद करा, यासह अन्य मागण्यांसाठी रिक्षा चालक – मालक संघटना कृती समितीने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. 'व्हॅलेंटाइन डे'(14 फेब्रुवारी) रोजी सकाळी अकरा वाजता प्रादेशिक परिवहन कार्यालया समोर (आरटीओ) तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती रिक्षा चालक-मालक संघटना कृती समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना ओला, उबेर, रॅपिडो व इतर अॅपद्वारे दुचाकी प्रवासी वाहतूक सुरू आहे. ही बाब परिवहन विभागाच्या सातत्याने लक्षात आणून दिले जात आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या कंपन्यांविरोधात कारवाई का केली जात नाही. बेकायदेशीर दुचाकी प्रवासी वाहतूक बंद करा, मुक्त रिक्षा परवाने बंद करा, फायनान्स कंपन्यांचे बेकायदेशीर पद्धतीने कर्ज वसुली थांबवा, रिक्षा चालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन कारा, अशा विविध मागण्यासाठी 14 फेब्रुवारी रोजी आंदोलन केले जाणार आहे, असे बाबा कांबळे यांनी सांगितले.
रिक्षा चालक-मालकांच्या प्रश्नांसाठी वारंवार निवेदने देण्यात आली. मात्र, त्याची दखल सरकार घेत नाही. शहरात सुरू असलेल्या बेकायदेशीर वाहतुकीमुळे रिक्षा चालक अडचणीत सापडला आहे. एखाद्या रिक्षा चालकाकडे अपुरी कागदपत्रे असल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. परंतु बेकायदा वाहतुकीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. ही वाहतूक बंद झाली पाहिजे, यासाठी आरोटीओ कार्यालयासमोर आंदोलन केले जाणार आहे. त्यामध्ये शहरातील जवळपास सर्वच रिक्षा संघटनांनी सहभागी व्हावे, यासाठी कृती समिती प्रयत्न करत आहे, असे संजय कवडे यांनी सांगितले.
या रिक्षा चालक-मालक कृती समितीमध्ये आम आदमी रिक्षा चालक मालक संघटना, पुणे शहर जिल्हा वाहतूक सेवा संघटना, महाराष्ट्र रिक्षा पंचायत, शिवनेरी रिक्षा संघटना, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना,आशीर्वाद रिक्षा संघटना, अजिंक्य रिक्षा संघटनेचे सदस्य आंदोलनात सहभागी होणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे बाबा कांबळे, पुणे शहर जिल्हा वाहतूक सेवा संघटनेचे संजय कवडे, अशोक साळेकर, आनंद अकुंश आदी उपस्थित होते.