पुणे : पुढारी वृत्तसेवा
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाइकांना शासनाकडून सानुग्रह साहाय्य देण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले. जिल्ह्यामध्ये शासनाकडे नोंदणी झालेल्या मृत्यूपेक्षा अधिकचे अर्ज आले आहेत. त्यामध्ये काही नातेवाइकांकडून एकापेक्षा अधिक अर्ज, तसेच जिल्ह्याबाहेरून देखील अर्ज आले आहेत.शासकीय अहवालापेक्षा अधिकचे अर्ज आले आहेत. मात्र, अद्याप हे सर्व अर्ज मंजूर केले नाहीत. 27 हजार 854 पैकी 16 हजार 500 अर्ज मंजूर केले आहेत. दरम्यान, शासकीय अहवालात नोंदविलेल्या पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात रविवारच्या आकडेवारीनुसार 19 हजार 568 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
शासनाकडे असलेली कोरोना मृतांची आकडेवारी व प्रत्यक्षात आलेले अर्ज, यांमध्ये फरक असल्याचे दिसून येत आहे. कोरोनामुळे व्यक्तींचा रुग्णालयात मृत्यू झाला असल्यास संबंधित रुग्णालयांकडून आयसीएमआरवर नोंद केली जाते. काही रुग्णालयांकडून आयसीएमआरवर नोंद न करणे अथवा रुग्णालयातून घरी सोडल्यानंतर मृत्यू झाला असल्यास त्या व्यक्तीची नोंद झाली नसणे, यामुळे ही तफावत आली असल्याची माहिती वरिष्ठ अधिकार्यांकडून देण्यात आली. जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या अर्जांची ऑनलाइनच पडताळणी करून अर्ज मंजूर करण्यात येतात. ज्या अर्जांमध्ये त्रुटी किंवा कागदपत्रे अपूर्ण आहेत, अशा अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी जिल्हा शल्यचिकित्सक अथवा पालिकेचे आरोग्य अधिकारी यांची समिती निर्णय घेणार आहे. अर्जदारांना त्यांचे म्हणणे आणि अपुरी कागदपत्रे सादर करण्याची संधी मिळणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
अर्जांचे पुढे काय झाले?
ऑनलाइन केलेल्या अर्जांचे पुढे काय झाले, मदत केव्हा मिळणार, याबाबत काही नातेवाईक प्रशासनाकडे विचारणा करीत आहेत. त्यावर, जसे शासनाकडून पैसे येतील तसे नातेवाइकांच्या खात्यावर जमा केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.