शिवसेनेचा हेतू मला मारण्याचा होता; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप, ट्विट केला व्हिडिओ | पुढारी

शिवसेनेचा हेतू मला मारण्याचा होता; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप, ट्विट केला व्हिडिओ

पुढारी ऑनलाईन डेस्क

५ फेब्रुवारीला रोजी माझ्यावर झालेला हल्ला मला मारण्याच्या हेतूने करण्यात आला होता. असा आरोप किरीट सोमय्या यांनी व्हिडिओ ट्विट करत केला आहे. किरिट सोमय्यांनी ट्विट केलेल्या या व्हिडियोमध्ये एक व्यक्ती हातात दगड घेऊन गाडीवर भिरकावण्याच्या प्रयत्नात दिसत आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर पुणे महानगरपालिकेत झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात प्रशांत लाडे (वय 30) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, भादवी कलम 143, 147, 149, 341, 336, 337, 323, 504 तसेच मु. पो. अ‍ॅक्ट कलम 37(1) सह 135 नुसार शहरअध्यक्ष संजय मोरे, पदाधिकारी चंदन साळुंके, किरण साळी, सुरज लोखंडे, आकाश शिंदे, रूपेश पवार, राजेंद्र शिंदे, सनि गवते यांच्यासह 60 ते 70 महिला व पुरूष कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

५ फेब्रुवारीला झालेल्या हल्ल्यानंतर शिवसेनेचे मुखपत्र सामनातून किलीट तोमय्यांना शिवसैनिकांनी पायरी दाखवली अशा आशयाची बातमी लावण्यात आली होती. किरीट सोमय्या हे शिवसेनेवर सतत भ्रष्टाचाराचे आरोप करत असतात. ५ फेब्रुवारीला सोमय्यांवर झालेल्या हल्ल्यांनंतर डॉक्टरांकडून किरीट सोमय्यांचे माकड हाड मोडल्याची आणि एक दिवसानंतर त्यांना डिस्जार्ज देण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली होती. किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर शिवसेनेच्या ८ नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये पुणे शिवसेना संजय मोरे यांचा समावेश होता.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्बो कोविड सेंटरमध्ये झालेल्या घोटाळाप्रकरणी महापालिका आयुक्तांची भेट घेण्यासाठी किरीट सोमय्या शनिवारी सायंकाळी पुणे महानगरपालिकेत आले होते. ते जुन्या इमारतीच्या मेनगेटने पायर्‍यांवरून जात असताना अचानक इमारतीच्या आतमधून शिवसेनेचे कार्यकर्ते जमले. त्यांनी सोमय्या यांना आत जाण्यापासून रोखले. एकाने त्याच्या अंगातील शर्ट काढून तो हवेत भिरवला व त्या शर्टने सोमय्या यांना फटका मारला. त्यानंतर सोमय्या यांची कॉलरपकडून हाताने जोर लावून खेचले व त्यांच्या जिवाला धोका होईल अशा पद्धतीने तिसर्‍या पायरीवरून ओढल्याने ते पडले. त्यामुळे त्यांच्या हाताला व डोक्याला मार लागल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हेही वाचलत का?

Back to top button