यवतमाळ : जि. प. गट, पंचायत समिती गणाचे प्रारुप राज्य निवडणूक आयोगाने मागितले | पुढारी

यवतमाळ : जि. प. गट, पंचायत समिती गणाचे प्रारुप राज्य निवडणूक आयोगाने मागितले

घाटंजी (जि. यवतमाळ) : पुढारी वृत्तसेवा

यवतमाळ जिल्हा परिषद व पंचायत समितीचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यापूर्वी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणाची फेररचना करण्यात येणार आहे. विशेषतः यवतमाळ जिल्हा परिषदेत ८ गट व पंचायत समितीचे १६ गण वाढणार आहे. यासाठी कच्चा आराखडा तयार करण्यात आला होता. सदरचा कच्चा आराखडा राज्य निवडणूक आयोगाने मागितला आहे. निवडणूक उपजिल्हाधिकारी व संबधित तहसीलदार यांना प्रारुप आराखड्यासह १३ फेब्रुवारीपर्यंत मागितले आहेत. १३ फेब्रुवारी रोजी उपस्थित राहण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाचे अप्पर सचिव अ. गो. जाधव यांनी दिले आहे.

सन २०२२ च्या महाराष्ट्र अधिनियम १८ दि. ३१ जानेवारी, २०२२ च्या सुधारीत तरतुदीनुसार २५ जिल्हा परिषद व २८४ पंचायत समित्याची प्रारुप प्रभाग रचना तयार करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहे. २ फेब्रुवारी, २०२२ च्या पत्रानुसार या सूचना देण्यात आल्या आहेत.
यवतमाळ जिल्हा परिषदेत १६ तालुक्यात ६१ जिल्हा परिषद गट आहेत. पंचायत समितीचे १०२ गण आहेत. वाढत्या लोकसंख्येसोबत ग्रामीण भागातील गट व गणांची संख्या वाढवली जाणार आहे. जिल्हा परिषदेचे ८ नवीन गट, तर १६ पंचायत समिती गणाची या पुढील होणार्‍या निवडणुकीत भर पडणार आहे, हे मात्र निश्चित.

Back to top button