

पुणे : पुढारी वृत्तसेवा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सत्र परीक्षा 15 फेब्रुवारीपासून ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेऊन परीक्षा व मूल्यमापन मंडळ तयारी करीत आहे. तर, आज होणार्या व्यवस्थापन परिषदेत किमान अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑफलाइन घेणे गरजेचे आहे, असा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. त्यामुळे परीक्षा कशा होणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन, याचे स्पष्टीकरण विद्यापीठाने द्यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांसह संघटनांनी केली आहे.
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाइन घ्याव्यात, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पुणे विद्यापीठाकडून 21 जानेवारीपर्यंत विद्यार्थ्यांकडून अर्ज भरून घेण्यात आले. परीक्षेसाठी साधारण साडेसहा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. संबंधित विद्यार्थ्यांची परीक्षा 15 फेब्रुवारीपासून ऑनलाइन घेण्याचे निश्चित झाले होते. परंतु, व्यवस्थापन परिषदेच्या काही सदस्यांनी किमान अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाइन घ्यावी, असा प्रस्ताव देण्याचे ठरविले आहे. त्यानुसार व्यवस्थापन परिषदेच्या आज होणार्या बैठकीत तसा प्रस्ताव सादर करण्यात येईल. संबंधित प्रस्ताव विद्या परिषदेकडे जाईल, त्यानंतर विद्या परिषदेची बैठक होऊन निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे परीक्षा ऑफलाइन होणार की ऑनलाइन, याकडे आता विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.
सध्या पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून परीक्षा ऑनलाइन घेण्याची तयारी झाली आहे, तर विद्यार्थ्यांची देखील मानसिकता ऑनलाइन परीक्षेचीच आहे. मात्र, विद्यापीठाने जर परीक्षा ऑफलाइन घेण्याचा निर्णय घेतला, तर पुन्हा प्रश्नपत्रिका तयार करणे, परीक्षा घेणे आणि निकाल जाहीर करणे, यासाठी प्रदीर्घ कालावधी जाईल आणि प्रथम सत्राचा निकाल लागण्यासच मे किंवा जून महिना उजाडण्याची शक्यता आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेणार म्हणत आहे, तर कधी ऑफलाइन पध्दतीने घेणार आहे, असे सांगत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्पष्टता येत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण होत असून, मानसिक त्रास होत आहे. विद्यापीठ प्रशासनाने यामध्ये कायमस्वरूपी स्पष्टता आणण्याची गरज आहे.
– कमलाकर शेटे, कार्यवाह, पुणे शहर, युवक क्रांती दल