Baramati Police : बारामतीत पोलिसांची आणखी एक रासलीला, दुसरे प्रकरण आले समोर | पुढारी

Baramati Police : बारामतीत पोलिसांची आणखी एक रासलीला, दुसरे प्रकरण आले समोर

बारामती ; पुढारी वृत्तसेवा : बारामतीतील एका पोलिस अधिकाऱ्याच्या युवतीबरोबर केलेल्या रासलिलांचे प्रकरण शमते न शमते तोच याच पद्धतीची आणखी एक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादाचा तपास करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकाने एमपीएससीच्या परीक्षेच्या नावाखाली पत्नीला पुण्यात ठेवले असून त्याच्याकडून हात-पाय मोडण्याची धमकी दिली जात असल्याची तक्रार संबंधित महिलेच्या पतीने पोलिस अधिक्षकांकडे केली आहे. हा अधिकारी पदाचा गैरवापर करत असून त्याला सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी त्याने केली आहे. दरम्यान पोलिस अधिक्षकांनी अपर अधिक्षकांना या घटनेच्या तपासाचे आदेश दिले आहेत. (Baramati Police)

बारामतीत नुकतेच एका पोलिस अधिकाऱ्याने केलेल्या रासलिलांची मोठी खमंग चर्चा झाली होती. त्या वादग्रस्त अधिकाऱ्याची बदली करण्यात आली. आता हा नवाच प्रकार पुढे आला आहे. तालुक्यातील एका गावातील महिलेने कौटुंबिक वादातून विष प्राशन केले होते. या घटनेचा तपास संबंधित अधिकाऱ्याकडे होता. त्याने तक्रारदार महिलेचा मोबाईल क्रमांक घेत तिच्याशी चॅट सुरु केले.

दिवसेंदिवस तिच्याशी संपर्क वाढवत जवळीक साधली. ती एमपीएससीचा अभ्यास करत असल्याची माहिती त्याला मिळाल्यावर त्याने तिला पुण्यात ठेवतो, तेथे लागेल ती मदत करतो, अशी भुरळ घातली. आपली पत्नी शिकून अधिकारी होईल या आशेपायी पतीने दोन मुली असताना तिला अभ्यासासाठी परवानगी दिली. परंतु ती पुण्यात गेल्यानंतर तिने कुटुंबाशी संबंध तोडणे सुरु केले.

Baramati Police : अधिकाऱ्याच्या नावाचा टॅटू तिच्या हातावर

१६ जानेवारी रोजी या अधिकाऱ्याच्या नावाचा टॅटू तिच्या हातावर पतीला दिसला. यावरून त्या दोघात वाद झाले. अधिकाऱ्याने लागलीच तिच्या पतीला फोन करत जाब विचारला. तुझे हात-पाय मोडीन अशी धमकी दिली. मी तिला माझ्या कंपनीतील १० टक्के वाटा देत आहे, तिला जर तू त्रास दिला तर गाठ माझ्याशी आहे, अशी धमकी त्याने दिल्याचे रेकॉर्डिंग तिच्या पतीने व्हायरल केले आहे.

हे प्रकरण गंभीर होत चालल्याचे लक्षात आल्यावर संबंधित तक्रारदार याने ही गोष्ट भावंडांना सांगितली. संबंधित कुटुंबाने लागलीच पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे तक्रार केली आहे. पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी तातडीने अप्पर पोलीस अधिक्षक यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान या प्रकरणामुळे संबंधित महिलेच्या पतीला प्रचंड मानसिक धक्का बसला असून. त्यांना आता दोन लहान मुली आहेत. आता या मुलींना मी आई कोठून आणून देऊ. माझे कुटुंब उद्‍ध्‍वस्‍त झाले आहे अशी आगतिकता पतीने व्यक्त केली.

यासंबंधी आलेल्या तक्रार अर्जावरुन चौकशी सुरु आहे. चौकशी पूर्ण झाल्यावरच यासंबंधी अधिक बोलता येईल.
– मिलिंद मोहिते, अपर पोलिस अधिक्षक, बारामती

Back to top button