

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने नवीन बांधकामामधील सदनिका आणि दुकाने यांच्या दस्तनोंदणीसाठी ई-रजिस्ट्रेशन संगणक प्रणाली उपलब्ध केली आहे. आतापर्यंत राज्यातील 250 हून अधिक गृहप्रकल्पांमध्ये ई-रजिस्ट्रेशन प्रणालीचा वापर सुरू झाला आहे. त्यानुसार गेल्या तीन वर्षांत राज्यात ई-रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून 11 हजार दस्तांची नोंदणी झाली आहे. या सुविधेमुळे बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयातून ऑनलाईन प्रणालीद्वारे दस्तनोंदणी करता येत असून, नागरिकांच्या वेळेत बचत होत आहे.
गेल्या काही वर्षांपासून मुद्रांक आणि नोंदणी विभागाच्या वतीने नागरिकांना ऑनलाईन सुविधा देण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
त्यासाठी संगणक प्रणालीचा वापर अधिकाधिक करण्यात येत आहे. एखाद्या नागरिकाने नवीन गृहप्रकल्पात सदनिका अथवा दुकान खरेदी केल्यानंतर त्याचा दस्तनोंदणी करण्यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयात जावे लागत होते. मात्र, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने ई-रजिस्ट्रेशनची सुविधा उपलब्ध करून दिली होती. परंतु, ती फक्त मोठ्या म्हणजे 50 पेक्षा अधिक सदनिका असलेल्या बांधकाम प्रकल्पांसाठीच होती. त्यानंतर त्यामध्ये बदल करून वीसपेक्षा अधिक सदनिका असलेल्या बांधकाम प्रकल्पासही ती उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
आता ही अटसुध्दा हटविण्यात आली आहे. ज्या विकासकांकडे रेरा रजिट्रेशन आहे, अशा विकसकांना ई-रजिस्ट्रेशनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे; जेणेकरून विकसकांना स्वत:च्या प्रकल्पातील सदनिका खरेदी-वि—कीचे दस्त या सुविधेच्या माध्यमातून कार्यालयातूनच अपलोड करता येतील. ते मंजूर झाल्यानंतर त्यांच्या कार्यालयातच रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
राज्यात पाचशेपेक्षा अधिक दुय्यम निबंधक कार्यालये आहेत. या कार्यालयामध्ये महिन्याला विविध प्रकारचे सरासरी दोन लाख दस्त नोंदविले जातात. मागील काही वर्षांपासून सदनिका खरेदीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नवीन बांधकाम प्रकल्पांना या सुविधेचा फायदा होत आहे. मागील तीन वर्षांत राज्यात 11 हजारांपेक्षा जास्त सदनिकांची विक्री या प्रणालीद्वारे नोंदविण्यात
आली आहे.
हेही वाचा