

भामा आसखेड: वन विभागाकडून पाण्याच्या टाकीसाठी जागेचा महत्वाचा प्रश्न मार्गी लागला असला तरी आंबेठाण गावची 11 कोटींची पाणीपुरवठा योजना रखडली आहे. अनेक महिन्यांपासून काम बंद पडल्याने योजना कधी पूर्ण होणार असा सवाल नागरिकांनी केला आहे.
एमआयडीसी टप्पा क्रमांक पाचमध्ये आंबेठाण गावचा समावेश आहे. परिसरात अनेक लहान मोठ्या कंपन्या आहेत. त्यामुळे गावच्या हद्दीत नागरिकरण वाढत चालले आहे. जलजीवन योजनेतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचे माध्यमातून 11 कोटीची पाणी योजना मंजूर झाली. योजनेचे काम मुंबईचे ठेकेदार विमोश गोरूर करीत आहेत. (Latest Pune News)
तीन लाख लिटर पाण्याची टाकी, एक लाख लिटरची भूमिगत टाकी, गावठाण सह वाडीवस्तीवर पाईपलाईन असे या योजनेचे स्वरूप आहे. आंबेठाण गावठाण सह दवणेमळा, सोळबनवस्ती, घाटेवस्ती, अंगारमळा, कोरेगाव फाटा या परिसरातील नागरिकांना योजनेचे पाणी मिळणार आहे.
ठेकेदाराने भूमिगत टाकीचे काम पूर्ण केले आहे. पाईपलाईनचे काम 70 टक्के झाले आहे. स्टोरेज टाकी ते मुख्य तीन लाख लिटर क्षमतेच्या टाकीपर्यंत पाईपलाईनचे काम बाकी आहे. साठवण टाकीतून मुख्य टाकीत पाणी टाकल्यानंतर पुरेशा दाबाने पाण्याचे वितरण केले जाईल. तीन लाख लिटर क्षमतेची टाकी बांधण्यासाठी गावात जागा नव्हती. परंतु, गावातील प्रमुख नागरिकांनी वनखात्याकडून जागा मिळविली. नवीन पाणी टाकी उंचावर असल्याने जादा दाबाने पाणी मिळणार आहे.
सध्या योजनेचे काम ठप्प झाले आहे. गावच्या हद्दीत नागरिकरण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने पाणी टंचाई भासत आहे. त्यामुळे नवीन पाणीपुरवठा योजना मार्गी लागणे गरजेचे आहे.
याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे शाखा अभियंता जगधने यांना विचारले असता, वनखात्याकडून टाकीसाठी जागा मिळाली आहे. परंतु, ज्या ठिकाणी टाकी बांधायची आहे तिथपर्यंत गाडी जात नसल्याने टाकीचे काम थांबले आहे.
ठेकेदार गोरूर यांना मोबाईलद्वारे संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत केलेल्या कामाचे पेमेंट ठेकेदाराला मिळालेले नाही.त्यामुळे संबंधित ठेकेदाराने काम बंद ठेवले आहे. काम करायला काहीही अडचण नाही,पेमेंट मिळणे गरजेचे आहे असे त्याचे म्हणणे आहे असे नाव न सांगण्याच्या अटीवर जबाबदार व्यक्तीने सांगितले.