

पुणे: पुण्यात मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले. शहरातील अनेक रस्त्यांना ओढ्याचे रूप आले होते. शिवाजीनगर, कात्रज, सिंहगड रोड, मध्यवस्तीतील पेठांचा परिसर, कोंढवा, सूस, पाषाण, बाणेर, कोथरूड परिसराला मुसळधार पावसाने झोडपले.
पाण्याच्या प्रवाहमुळे अनेक वाहने वाहून गेली, तर अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. रस्त्यावर पाणी साठल्याने पुणे महानगरपालिकेच्या 83 टक्के नाले व ड्रेनेजसफाईची पोलखोल झाली. (Latest Pune News)
पुण्यात मंगळवारी पावसाने तुफान हजेरी लावली. या पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली होती. काही ठिकाणी पाण्यामुळे रस्ते बंद करण्याची वेळ आली. पावसाळ्यापूर्वी पालिकेमार्फत शहरात नालेसफाई आणि ड्रेनेजसफाई करण्यात आली होती.
मात्र, मंगळवारी झालेल्या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्याने या सफाईची पोलखोल झाली. शहरात जागोजागी पाणी साठल्याने बहुतांश मार्गांवर वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली. शहरातील पाणी साठणार्या 201 ठिकाणांपैकी कामे करण्यात आलेल्या काही ठिकाणी देखील पाणी साठल्याने ही कामे खरेच दर्जात्मक झाली का? हा प्रश्न देखील आता उपस्थित झाला आहे.
पाणी साचलेले रस्ते
1) गुंजन चौक
2) सुखसागरनगर
3) कात्रज चौक
4) वारजे सर्व्हिस रस्ता
5) गांधी भवन
6) इतिशा सोसायटी, कोथरूड
7) सुतारवाडी, एलएमडी चौक
8) आंबेगाव, हायवे सर्व्हिस रोड
9) लालबहादूर शास्त्री रस्ता ते मांगीरबाबा चौक येथे पाण्याच्या प्रवाहामुळे खड्डा पडला.
10) पुणे-सातारा मार्गावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने महामार्गावरील वाहतूक संथ झाली होती.
आंबिल ओढ्याला पूर
शहरात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे आंबिल ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी वाढल्याने पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. दांडेकर पुलावर देखील चार ते पाच फूट पाणी साचले होते. ओढ्याला पूर आल्याने मांगीरबाबा मंदिरपासून दत्तवाडीचा रस्ता बंद करण्यात आला.