येरवडा : आत्महत्येचा बदला घेण्यासाठी महिलेच्या मुलाचे अपहरण | पुढारी

येरवडा : आत्महत्येचा बदला घेण्यासाठी महिलेच्या मुलाचे अपहरण

पुणे, पुढारी वृत्तसेवा : प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याच्या संशयातून एका महिलेच्याच्या मुलाचे अपहरण करणार्‍या पाच जणांच्या टोळक्याला येरवडा पोलिसांच्या पथकाने लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पेरणे फाटा येथून बेड्या ठोकल्या. त्यांना १८ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

विजय राम गेचंद (३१) अजय रानबा हावळे (२१), विकास आनंद भंडारी (३०), जमीर करीम शेख (१९) आणि सुरज गंगाराम मोर्य (२६, सर्व रा. राजीव गांधीनगर, येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका ३७ वर्षीय महिलेने आपल्या मुलाच्या अपहरणाबद्दल येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गुन्ह्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे यांनी सांगितले, “अपहरण करण्यात आलेला २० वर्षाचा मुलाच्या आईबरोबरच आत्महत्या केलेल्या सनी राम गेचंद याच्यासोबत प्रेमसंबंध होते. याच प्रेम संबंधातून सनीने आत्महत्या केल्याचा सनीचा भाऊ विजय गेचंद याला संशय होता. आपल्या भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्यांनी त्याच्या इतर साथीदारांबरोबर कल्याणीनगर येथील डीमार्टमध्ये कामाला असलेल्या तरूणाचे रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास कारमध्ये घालून अपहरण केले.”

“बराच वेळ मुलगा घरी न आल्याने त्याच्या आईने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, उपायुक्त रोहिदास पवार, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनिस शेख, गुन्हे निरीक्षक विजयसिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके तयार करून ती तपासासाठी पाठविण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र आळेकर, उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे, उपनिरीक्षक किरण लिटे आणि उपनिरीक्षक पाटील यांच्या पथकांना आरोपी लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याचे समजले.”

“त्वरीत पथकेही त्या दिशेने रवाना झाली. पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पथकांनी पेरणे फाटा येथून तरूणाची सुटका करत पाच जणांना ताब्यात घेतले. पाचही जणांना या प्रकरणी अटक करण्यात आली असून त्यांना रविवारी दुपारी पोलीस कोठडीसाठी न्यायालयात हजर करण्यात आले. अधिक तपासासाठी न्यायालयाने त्यांना १८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे करीत आहेत”, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Back to top button