Solapur Accident : जीप झाडाला धडकून झालेल्या अपघातात सोलापूरच्या तिघांचा जागीच मृत्यू - पुढारी

Solapur Accident : जीप झाडाला धडकून झालेल्या अपघातात सोलापूरच्या तिघांचा जागीच मृत्यू

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : सोलापूर – विजयपूर महामार्गावरील औराद येथून सोलापूरकडे येत असताना स्कॉर्पिओ जीप झाडाला धडकून झालेल्या अपघातात सोलापूर शहरातील तिघां तरुणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. (Solapur Accident)

किशोर अण्णा भोसले (वय ४५, राहणार सळई मारुती मंदिर पत्रा तालीम उत्तर कसबा सोलापूर), नितीन भगवान भांगे (वय 32, राहणार निराळे वस्ती सोलापूर), व्यंकटेश राम म्हेत्रे (वय 45, राहणार मोदीखाना सोलापूर) अशी ठार झालेल्यांची नावे असून या अपघातात राकेश हुच्चे (राहणार सोलापूर) हा जखमी झाला आहे.

मरण पावलेले किशोर भोसले, नितीन भांगे, व्यंकटेश म्हेत्रे हे तिघे स्कॉर्पिओ जीप क्रमांक एम एच 13 एझेड 9909 मध्ये बसून शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास औराद वरून सोलापूरच्या दिशेने येत होते. जीप तेरामैल जवळील वकील वस्तीजवळ आली असता रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जोरात धडकली.

Solapur Accident : उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले

यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले. या तिघांना गंभीर जखमी अवस्थेत पहाटे चारच्या सुमारास त्यांचा मित्र संभाजी जुगदार यांनी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

नितीन भांगे हा मंडप कॉन्ट्रॅक्टर असून तिघेही लाईट डेकोरेशन च्या कामासाठी औराद परिसरात गेले होते. काम संपवून रात्री घरी परतत असताना त्यांचा अपघात होऊन मृत्यू झाला. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे.

Back to top button