Ajit Pawar : फेक कॉल ॲपद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर, बिल्डरकडे मागितली २० लाखांची खंडणी | पुढारी

Ajit Pawar : फेक कॉल ॲपद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर, बिल्डरकडे मागितली २० लाखांची खंडणी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : फेक कॉल ॲपद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून शहरातील एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाकडे 20 लाखांची खंडणी मागण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच वाडेबोल्हाई येथील जागेचा वाद सोडविण्याबाबत धमकी देखील देण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकाने सहा जणांना खंडणी घेण्यासाठी आले असता रंगेहाथ अटक केली आहे. नवनाथ भाऊसाहेब चोरामले (वय 28, रा हवेली), सौरभ नारायण काकडे (वय 20 रा हडपसर), सुनील उर्फ बाळा गौतम वाघमारे (वय 28), किरण रामभाऊ काकडे (वय 25), चैतन्य राजेंद्र वाघमारे (वय 19 रा भेकराई नगर, फुरसुंगी), आकाश शरद निकाळजे (वय 24) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

Ajit Pawar : बांधकाम व्यावसायिकाने बंडगार्डन पोलिस ठाण्यात दिली फिर्याद

याबाबत बांधकाम व्यावसायिकाने बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार मागील दहा दिवसांपासून 13 जानेवारीपर्यंत सुरू होता. आरोपी उपमुख्यमंत्री यांचा पीए चौबे बोलतोय म्हणून फिर्यादींसोबत संपर्क करत होते.

अटक आरोपी यांनी आपसात संगनमत करून गूगल प्ले स्टोअर वरून फेक कॉल ॲप नावाचे ॲप डाऊनलोड केले. या ॲपद्वारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा वापर करून त्यावरून फिर्यादींना संपर्क केला. आरोपी त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पीए चौबे बोलतोय असे सांगत होते.

फिर्यादी यांना हवेली तालुक्यातील वाडेबोल्हाई येथील शिरसाटवाडीमधील एका जमिनीचा वाद मिटवून टाका असे खोटे सांगून त्यांना गावात पाऊल ठेवू देणार नाही, त्यांचा कोणताही प्रकल्प होऊ देणार नाही अशी धमकी दिली. तसेच त्यांच्याकडे 20 लाख रुपयांची खंडणी मागून यातील दोन लाख रुपये आरोपींनी घेतले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

हा प्रकार घडल्यानंतर फिर्यादींनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून सर्व आरोपीना खंडणी घेण्यासाठी आले असता रंगेहाथ पकडले. काकडे याने हे फेक ॲप डाउनलोड करून फिर्यादीसोबत संपर्क केला. त्यानंतर त्यांच्या जमिनीचा वाद मिटवून घ्या असे सांगून खंडणीची मागणी केली. या फेक ॲपद्वारे दुसऱ्या व्यक्तीच्या नावे समोरील व्यक्ती संपर्क साधला जातो. त्यातूनच आरोपींनी हा प्रकार केला.

Back to top button