इंदापूर : अपघात झालेल्या कंटेनरमध्ये सापडला २३ लाखांचा गुटखा | पुढारी

इंदापूर : अपघात झालेल्या कंटेनरमध्ये सापडला २३ लाखांचा गुटखा

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा : इंदापूर शहरानजीक अपघातग्रस्त कंटेनरमधून इंदापूर पोलिसांनी सुमारे २२ लाख २७ हजार ५०० रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. विक्रीस व वाहतुकीस बंदी असलेला आणि मानवी आरोग्यास अपायकारक असणारा गुटखा पोलिसांना कंटेनरमध्ये आढळून आला. इंदापूर पोलिसांनी गुटखा व २५ लाख रुपये किंमतीचे एक सहाचाकी वाहन असा एकूण ४७ लाख २७ हजार ५०० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

यासंदर्भात इंदापूर पोलिस ठाण्यात पोलीस शिपाई सुहास सिंकदर आरणे यांच्या फिर्यादीवरुन आरोपी हनीफ सय्यद (रा. बेंगलोर) व कंटेनर (केए ०१ एएफ ३३९६) च्या मालकाविरुध्द  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, रविवारी (दि. ९) पहाटे देशपांडे हॉटेलच्या समोर कंटेरनचा उसाच्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडक बसून अपघात झाला होता. याची इंदापूर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली होती. जखमी वाहन चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामध्ये कंटेनरचा पुढील भाग चक्काचूर झाल्याने क्रेनच्या मदतीने तो पोलीस ठाण्यात आणण्यात आला.

त्यानंतर पोलिसांनी आज (दि. २३) त्या कंटेनरमध्ये कोणता माल आहे, काही संशयास्पद तर नाही ना हे पाहिले असता विक्रीस व वाहतुकीस बंदी असलेला सुमारे २२ लाख रुपये किमतीची ४५ पोती शासनाने प्रतिबंधीत केलेला व मानवी आरोग्यास अपायकारक असलेला आर. के. प्रिमीयम कंपनीचा गुटखा मिळून आला. याचसोबत २५ लाख रू किंमतीचे एक सहा चाकी वाहन असा एकूण ४७ लाख २७ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी दिली. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक महेश माने करीत आहेत.

Back to top button