सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी मनीष दळवी, उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर विजयी

सिंधुदुर्गनगरी : लवू म्हाडेश्वर
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ अपेक्षेप्रमाणे भाजपचे मनीष दळवी यांच्या गळ्यात पडली आहे. तर उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर हे विजयी झाले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने विजय प्राप्त केला आहे. या निवडणुकीत 19 पैकी 11 सदस्य हे भाजपचे निवडून आले आहेत. तर आठ संचालक पदांवर महाविकास आघाडीच्या संचालकांना विजय मिळवता आला होता. आज गुरुवारी या बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्षपदासाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपचे मनिष दळवी यांनी अध्यक्षपदासाठी तर अतुल काळसेकर यांनी उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले होते. तर महाविकास आघाडीच्या वतीने अध्यक्षपदासाठी व्हिक्टर डांटस तर उपाध्यक्षपदासाठी सुशांत नाईक यांनी अर्ज दाखल केले होते. या निवडणुकीसाठी गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत भाजपचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी ११ विरुद्ध ७ अशा मतांनी विजय मिळवला. महाविकास आघाडीच्या सदस्या सौ. अनिता राणे या निवडणूक प्रक्रियेत अनुपस्थित राहिल्या होत्या.
नारायण राणे यांची उपस्थिती….
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी प्रत्यक्ष गुप्त पद्धतीने मतदान झाले. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांसाठी दोन्ही पक्षांकडून दाखल झालेले अर्ज वैध ठरल्याने प्रत्यक्ष गुप्त पद्धतीने मतदान झाले. जिल्हा बँक अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे प्रत्यक्ष उपस्थित राहिले. जिल्हा बँकेकडे येऊन ते पुन्हा जवळच असलेल्या जिल्हा परिषदेत ठाण मांडून होते.
हे ही वाचा :
- Sindhudurg District Bank : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी भाजपकडून नावे निश्चित
- सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक : ‘म्याव-म्याव नाही तर तो डरकाळी फोडतो’, भाजपनं पुन्हा शिवसेनेला डिवचलं