

पुणे: महाराष्ट्र साहित्य परिषदेतील वाद संपता संपेना, असेच चित्र पाहायला मिळत आहे. परिषदेतील सत्तासंघर्ष आता शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडीपर्यंत पोहचला आहे.
परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांविरोधात अविश्वास ठराव दाखल करणाऱ्या कार्यकारी मंडळातील काही सदस्यांनी अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर (पुणे), ज्येष्ठ लेखक रमेश पतंगे (मुंबई) आणि ज्येष्ठ लेखक, कादंबरीकार आणि प्रकाशक बाबा भांड (छत्रपती संभाजीनगर) यांची नावे सुचवली असून, यापैकी एका नावाची निवड करून मसापमधील बहुसंख्य सदस्यांच्या मताचा आदर करावा, असे पत्र सदस्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम सप्रे यांना पाठवले आहे. संमेलनाध्यक्षपदासाठी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे, ज्येष्ठ विचारवंत-लेखक डॉ. शेषराव मोरे, लेखक-अनुवादक चंद्रकांत भोंजाळ, कवी प्रवीण दवणे यांचीही नावे चर्चेत असून, आता संमेलनाध्यक्ष कोण होतील? याबाबतचे चित्र पुढील आठवड्यात स्पष्ट होणार आहे.
पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात २८ ते ३१ जानेवारी २०२७ दरम्यान शंभरावे साहित्य संमेलन होणार आहे. सोमवारी (दि. २३ नोव्हेंबर) मार्गदर्शक समितीची, तर मंगळवारी (दि. २४) साहित्य महामंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत संमेलनाध्यक्षपदाची निवड केली जाणार आहे. 'मसाप'च्या कार्यकारी मंडळातील सदस्यांच्या वतीने साहित्य महामंडळाच्या उपाध्यक्षांना पत्र पाठविण्यात आले असून, पत्राद्वारे संमेलनाध्यक्षपदासाठी तीन नावे सुचविण्यात आली आहेत. त्यामुळे यंदाच्या संमेलनाध्यक्षपदासाठी मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.
'मसाप'च्या तिन्ही पदाधिकाऱ्यांना कामकाज करण्याचा नैतिक अधिकार नाही
साहित्य महामंडळाचे कार्यालय तीन वर्षांसाठी परिषदेकडे असून, परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर हेच महामंडळाचेही प्रमुख पदाधिकारी आहेत. या प्रमुख पदाधिकाऱ्यांविरोधात कार्यकारी मंडळातील सदस्यांनी २७ ऑक्टोबर रोजी अविश्वास ठराव दाखल केला आहे. घटनेनुसार अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी ११ नोव्हेंबरनंतर लगेच कार्यकारी मंडळाची बैठक बोलावणे बंधनकारक होते. मात्र, पंधरा दिवसांची मुदत संपल्यानंतरही ठरावावर कारवाई न केल्याने तिन्ही पदाधिकाऱ्यांना कोणतेही कामकाज करण्याचा नैतिक आणि कायदेशीर अधिकार उरला नसल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे. त्यामुळे सोमवारी (दि. २३) आणि मंगळवारी (दि. २४) होणाऱ्या बैठका रद्द कराव्यात किंवा संमेलनाध्यक्षपदासाठी बहुसंख्य सदस्यांनी सुचविलेल्या तीन नावांचा विचार करावा, अशी मागणी सदस्यांनी केली आहे. याविषयी उपाध्यक्ष पुरुषोत्तम सप्रे यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
नावे सुचविण्याच्या अधिकारावरही प्रश्नचिन्ह
साहित्य महामंडळाच्या चार घटक संस्थांना अध्यक्षपदासाठी प्रत्येकी जास्तीत जास्त तीन नावे, तर संलग्न आणि समाविष्ट संस्थांना प्रत्येकी एक नाव सुचविण्याचा अधिकार आहे. त्यानुसार २१ सदस्यांच्या गटाने तीन नावे पाठवली आहेत. मात्र, 'मसाप'चे विद्यमान प्रमुख पदाधिकारी पदावर कायम असताना कार्यकारी मंडळातील इतर सदस्यांना परस्पर नावे सुचविता येतात का? असा प्रश्न महामंडळाच्या माजी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. 'मसाप'मधील अविश्वास ठरावावर शनिवारी (दि. २८ नोव्हेंबर) निर्णय होणार आहे. त्यापूर्वीच २४ नोव्हेंबरला महामंडळाची बैठक होत असल्याने अध्यक्षपदाच्या निवडीकडे साहित्यवर्तुळाचे लक्ष लागले आहे.