

पुणे: लावणीपासून ते महाराष्ट्राची लोकधारापर्यंत... शाहिरीपासून ते जागरण, या महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल लोककला... चैत्र पाडव्यानंतर यात्रा-जत्रांचा सीझन सुरू झाल्यावर खर्या अर्थाने लोककलांच्या कार्यक्रमांचीही संख्या वाढते... यंदाही असेच चित्र आहे... चैत्र पाडव्याला यात्रा- जत्रा सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रातील शहरी भागांसह ग्रामीण भागांतही लोककलांचे कार्यक्रम रंगू लागले आहेत. त्यामुळेच आता लोककलावंतही महाराष्ट्रभर दौरे करून कलेचे सादरीकरण करत आहेत.
यावर्षी लोककलांच्या कार्यक्रमांना चांगले बुकिंग मिळाले आहे आणि त्याचा आर्थिक फायदाही कलावंतांना होत आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत लोककलांचा कार्यक्रम रंगणार असून, कलावंतांसाठी यंदाचा सीझन आनंद घेऊन आला आहे. (Latest Pune News)
सध्या ग्रामीण भागात यात्रा- जत्रा सुरू झाल्या असून, लोककलांच्या कार्यक्रमांना यात्रा- जत्रांमध्ये प्रतिसाद असतो. यंदाही हाच प्रतिसाद पाहायला मिळत असून, लोककलावंत कार्यक्रमांसाठी राज्यभर प्रवास करीत आहेत.
तमाशा, लावणी, महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमांना सर्वाधिक प्रतिसाद आहे. खास करून कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक, मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, धाराशिव, अहिल्यानगर आदी ठिकाणी लोककलांचे कार्यक्रम होत असून, कलावंतांना विविध संस्थांकडून कार्यक्रमांसाठी विचारणा होत आहे. त्यामुळेच लोककलावंतांचा संपूर्ण समूह कार्यक्रमांसाठी ठिकठिकाणी दौरे करत आहे.
याविषयी शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, यात्रा- जत्रांमध्ये लोककलांच्या कार्यक्रमांसाठी कलावंतांना विचारणा सुरू झाली आहे. खर्या अर्थाने कलावंतांसाठी हाच काळ कमाईचा असतो. यावर्षी कार्यक्रमांसाठी कलावंत राज्यभर दौरे करत असून, विशेष करून ग्रामीण भागातील यात्रा- जत्रांमध्ये कार्यक्रम सादर होत आहेत.
लावणीनिर्माते शशिकांत कोठावळे म्हणाले, लावणीच्या कार्यक्रमांनाही प्रतिसाद आहे. संपूर्ण समूह त्यासाठी शहर भागासह ग्रामीण भागाचा प्रवास करत आहे. या वर्षीचा सीझन कलावंतांसाठी आर्थिक फायद्याचा ठरत आहे.
या लोककलांचे सादरीकरण
शाहिरी असो वा भारूड... कीर्तन असो वा वासुदेव... अशा लोककलांनी महाराष्ट्राच्या मातीला समृद्ध केले. लोककलांच्या कार्यक्रमांना कोकण विभाग असो वा जळगाव... विविध जिल्ह्यांमध्ये प्रतिसाद मिळत असून, शाहिरी, वासुदेव, पोतराजसह महाराष्ट्राची लोकधारा आदी कार्यक्रमांचे सादरीकरण कलाकार करत आहेत.
असे आहे अर्थकारण!
आत्ताच्या घडीला एक लोककलावंत महिन्याला सात ते आठ कार्यक्रम सादर करत आहे. पारंपरिक वेशभूषेत लोककलांचे सादरीकरण होत असून, यात्रा- जत्रांमध्ये लोककलांच्या कार्यक्रमांना सर्वाधिक मागणी आहे. एका कार्यक्रमासाठी 4 ते 15 हजार रुपयांपर्यंतचा आर्थिक मोबदला मिळत आहे.
मार्च महिन्यापासून कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. जागरण गोंधळच्या कार्यक्रमांसाठी विविध जिल्ह्यांचा दौरा करत असून, पुण्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर, अमरावती आदी जिल्ह्यांमध्ये कार्यक्रम केले आहेत, आत्ताही कार्यक्रमांसाठी प्रवास सुरू आहे. मे महिनाअखेरपर्यंत लोककलांचे कार्यक्रम रंगणार आहेत.
- राहुल पवार, लोककलावंत