

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालात कला शाखेच्या निकालात सातत्याने घट होत असून, गेल्या चार वर्षांत हा निकाल 10 टक्क्यांनी घटला आहे. यंदा तर तब्बल 5.36 टक्क्यांनी निकाल घटला आहे.
हा निकाल घटण्याचे कोणतेही ठोस कारण नसल्याची माहिती राज्य मंडळाने दिली आहे. परंतु, अकरावीला विज्ञान आणि वाणिज्य शाखेकडे गुणवंत विद्यार्थ्यांचा ओढा वाढल्याने, कला शाखेत उर्वरित विद्यार्थी प्रवेश घेतात. या विद्यार्थ्यांकडून अभ्यासाकडे व्यवस्थित लक्ष न दिल्याने, अनुत्तीर्णांचे प्रमाण वाढत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. (Latest Pune News)
राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षेतील कला शाखेच्या निकालात कमालीची घट झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. त्या तुलनेत विज्ञान आणि वाणिज्य शाखेमध्ये उत्तीर्ण होण्याच्या प्रमाणात फारसा बदल झालेला नाही. गेल्या चार वर्षांत या शाखेच्या निकालात साधारण एक टक्क्याचा फरक जाणवतो. त्याचवेळी कला शाखेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण हे 9.99 टक्क्यांनी घटले आहे.
गेल्या वर्षी बारावीच्या परीक्षेच्या निकालात उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण 85.88 टक्के होते, तर यंदाच्या निकालात ते 80.52 टक्के झाले आहे. त्यामुळे एकाच वर्षात हे प्रमाण 5.36 टक्क्यांनी कमी झाले आहे. कला शाखेतील उत्तीर्णांचे प्रमाण घटणे ही कला शाखेसाठी धोक्याची घंटा असल्याचे सांगितले जात आहे. याचा थेट परिणाम हा पदवी अभ्यासक्रमांवर होणार असल्याचे काही अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांनी फिरवली पाठ
विज्ञान आणि वाणिज्य शाखेतून उच्च शिक्षण घेतल्यानंतर रोजगाराच्या अन् नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होतात. परंतु, त्या तुलनेत कला शाखेतून शिक्षण घेतल्यानंतर उपलब्ध होत नाहीत. त्यातच जगात सध्या तंत्रज्ञानाचा बोलबाला असल्याने विज्ञान शाखेचे महत्त्व वाढले आहे. त्या खालोखाल वाणिज्य शाखेतील पदवीधरांनाही खासगी क्षेत्रात चांगल्या संधी आहेत. ही बाब लक्षात घेता कला शाखेकडे गुणवंत विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
कला शाखेचा निकाल
वर्ष - टक्केवारी
2022 - 90.51
2023 - 84.05
2024 - 85.88
2025 - 80.52
कला शाखेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण घटण्याचे ठोस कारण सांगता येणार नाही. परंतु, दहावीत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा ओढा हा विज्ञान आणि वाणिज्य शाखेकडे वाढला आहे. त्यानंतर विद्यार्थी कला शाखेत प्रवेश घेत असल्याचे चित्र आहे. तरीदेखील यंदा जो निकाल घटले आहे, त्याची कारणमीमांसा करण्यात येणार आहे.
- शरद गोसावी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ