

वाडा : मच्छिंद्र आगिवले
निसर्ग जेव्हा जेव्हा कोपतो तेव्हा त्याचा पहिला बळी शेतकरी ठरतो. यावर्षीही पडलेल्या दुष्काळजन्य परिस्थितीत वाडा तालुक्यातील भातशेती करणारा शेतकरी चिंतेत सापडला आहे. कागदोपत्री सरकारने पालघर जिल्ह्याला दुष्काळाच्या यादीतून हद्दपार केले असले तरी प्रत्यक्षात पालघर व सर्वाधिक भातशेती करणाऱ्या वाडा तालुक्यात परिस्थिती चिंताजनक आहे.
सरकारने राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला मात्र पालघर व ठाणे जिल्ह्याला यातून वगळण्यात आल्याने आधीच संताप व्यक्त केला जात आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात भातशेती जरी हिरवीगार दिसत असली तरी प्रत्यक्ष परिस्थिती अतिशय भीषण व भयावह आहे. अती पाण्याच्या जागा वगळता बहुतांश शेती कोरडी पडली असून यामुळे बहरून आलेली पिकं संकटात सापडली आहेत.
हळवी भातशेती अंतिम टप्प्यात असून हा भातशेतीसाठी अतिशय महत्वाचा काळ आहे. तालुक्यात पावसाने पाठ फिरवून आता महिना होणार असून पूर्ण शेतीत आता भेगा फाटून कोरडी पडली आहे. हाताशी आलेले पिकं वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असून ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे ते शेतकरी कृत्रिम पाणीपुरवठा करीत आहेत. ओहोळांवर पाणी अडवून शेतीला वळविण्याचा आटापिटा करण्यात अनेक शेतकरी व्यस्त असल्याचे बघायला मिळत असून परिस्थिती अधिक गंभीर बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वाडा तालुक्यात १४ हजार हेक्टर क्षेत्रावर भातशेती केली जात असून बहुतांश शेतकऱ्यांची आर्थिक मदार शेतीवर असते. प्रत्यक्ष दुष्काळजन्य स्थिती असतानाही प्रशासन व सरकार नेमके काय करीत आहे असा सवाल शेतकरी विचारीत आहेत. लोकप्रतिनिधींनी पत्रव्यवहार करून सरकारला ठाणे व पालघर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा अशी विनंती केल्याचे प्रसिद्ध करण्यात आले मात्र सरकार प्रत्यक्ष परिस्थिती तपासून पालघर व वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देईल का असा सवाल विचारला जात आहे. कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी संपर्क केला मात्र त्यांच्याकडून कोणतेही ठोस उत्तर मिळाले नाही.
वनपट्टा व एकसाली पलाट अशा ८ एकर क्षेत्रात भातशेती बहरून आली असून गर्भधारणेच्या प्रक्रियेत आहे. पाण्याअभावी शेती कोरडी पडू लागली असून पाऊस पडण्याची कोणतीही चिन्ह दिसत नाहीत. ओहोळात देखील पाणी शिल्लक नसून शेती वाचविण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करीत आहोत. सोसायटी कडून कर्ज घेतली असून ती फेडण्याची चिंता आहेच मात्र खाण्यासाठी तांदूळ मिळण्याची भ्रांत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शंकर फराड, शेतकरी , मूरबीचापाडा.