

नवी मुंबई : शहरातील पाणीसाठ्यावर वाढता ताण लक्षात घेता नवी मुंबई महापालिका प्रशासनाने अनधिकृत पाणीवापर व पाणीचोरीविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या आदेशानुसार तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान मोठ्या प्रमाणात अनधिकृत पाणी वापर होत असल्याचे आढळून आले.
शहर अभियंता शिरीष आरदवड, सहायक अतिरिक्त शहर अभियंता मदन वाघचौडे, कार्यकारी अभियंता शंकर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. उपअभियंता अजित भवारी यांच्या नेतृत्वाखालील कनिष्ठ अभियंता विनोद जैन यांच्या पथकाने कोपरखैरणे परिसरातील बांधकाम प्रकल्प तसेच इतर ठिकाणी पाणीपुरवठा व्यवस्थेची तपासणी केली. तपासणीदरम्यान काही ठिकाणी अनधिकृत जोडण्यांद्वारे पाणीवापर होत असल्याचे निदर्शनास आले.
महापालिका पथकाने कारवाई करत तब्बल १८ बांधकाम पाणीजोडण्या तत्काळ खंडित केल्या. तसेच पाण्याचा गैरवापर करणाऱ्या ३५ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या. अनधिकृतरीत्या पाणी उपसण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ११ मोटारी जप्त करण्यात आल्या असून सुमारे २ हजार मीटर रनिंग पीयुसी पाईप जप्त करण्यात आल्या आहेत.
शहरातील उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन आणि सर्व नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी अनधिकृत पाणी वापर, पाणीचोरी तसेच पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
या धडक कारवाईमुळे अनधिकृतरीत्या पाणी वापरणाऱ्या तसेच पाणीचोरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून मनपाच्या कारवाईमुळे परिसरातील बेकायदा पाणी जोडण्यांना आळा बसण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.