

वाडा : वाडा तालुक्यातील बहुतांश रस्त्यांची अवस्था आधीच दयनीय असून त्यांवर करण्यात येणारा खर्च निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे वाया जात असल्याचे लोकांचे म्हणणे आहे. वाडा ते मलवाडा या जवळपास 11 किमी मार्गावर जागोजागी खड्ड्यांची चादर पसरलेली असून रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लोकांच्या अनेक तक्रारी आहेत.
बुधवारी या मार्गावर खड्ड्यांची दुरुस्ती एका कंत्राटदाराच्या मार्फत पिडब्लूडी विभागाकडून सुरू असून ही दुरुस्ती म्हणजे निव्वळ थुकपट्टी आहे असा लोकांचा आरोप आहे. संतप्त नागरिकांनी सुरू असणाऱ्या दुरुस्तीजवळ एकत्र येऊन कंत्राटदाला उत्तम काम करण्याच्या सूचना केल्या आहेत.
मलवाडा मार्गावर खरेतर आजपर्यंत कोट्यवधींचा निधी खर्च झाला असून कधी पूल उभारणी, टप्पा टप्प्यात डांबरीकरण, रस्त्याची डागडुजी, कोरे किलोमीटर स्टोन, मोऱ्या अशा अनेक प्रकारच्या कामांचा यात समावेश आहे. तालुक्यातील काही ठराविक खराब रस्त्यांमध्ये मात्र आजही मलवाडा मार्गाचा समावेश असून हा मार्ग वाहतुकीसाठी अतिशय महत्वाचा आहे.
सध्या या मार्गावर जवळपास 5 कोटी रुपयांचा खर्च करून काँक्रीटीकरण करण्यात येत असून हे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. पूर्ण मार्गाचे काँक्रीटीकरण व्हावे अशी मागणी असताना अचानक खड्ड्यांची दुरुस्ती एका कंत्राटदाराने हाती घेतली आहे. मागील इतिहास बघता या मार्गावर होणारी कामे अतिशय कुचकामी असून त्यांच्या लोकांना मात्र कोणताही फायदा होताना दिसत नाही.
खड्डेदुरुस्ती देखील अशाच प्रकारे सुरू असल्याचा आरोप करीत अनेक स्थानिक नागरिकांनी कामाच्या ठिकाणी येऊन कंत्राटदाराला अंदाजपत्रकानुसार करावे अशा सूचना केल्या. तातडीने या सूचनांची दखल घेऊन कंत्राटदाराने चांगल्या पद्धतीने कामाला सुरुवात केली मात्र हा पूर्ण रस्ता काँक्रीटीकरण व्हावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.